Missing Link Project : मिसिंग लिंक (Mumbai-Pune Expressway Missing Link project) जगातला सगळ्यात रुंद बोगदा आहे. हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली हजार फूट असणार आहे. जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरुन हा मिसिंग लिंक तयार केला आहे. यामुळे नेहमीच्या वेळापेक्षा मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते. 


मुंबई-पुणे प्रवासाला आठ तास लागत होते. त्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे झाला. आज पुणे-मुंबई प्रवास आता चार तासांवर आला. त्यात पुण्यातून मुंबईत किंवा मुंबईतून पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. यात महत्वाचं म्हणजे पुण्यातील किंवा आजूबाजूच्या लोकांना या महामार्गामुळे रोजगार मिळाला. पुणे आयटी हब झालं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीदेखील आली, त्यामुळे या महामार्गांचा उपयोग होतोच शिवाय रोजगारही मिळतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.


कसा आहे मीसिंग लिंक प्रकल्प ?


खालापूर ते सिंहगड असा हा मिसिंग लिंक प्रकल्प असेल. आता जर आपण पाहिले तर खालापूर ते सिंहगडपर्यंतचे अंतर हे 19 किलोमीटर इतके आहे. मिसिंग लिंक प्रकल्प सुरु झाल्यानंतर हे अंतर 13.30 किलोमीटर इतके होईल. एकंदरीत 6 किलोमीटर इतके अंतर या प्रकल्पामुळे कमी होईल तसेच घाटातील अपघात टाळण्यासाठी आणि शून्य अपघात रस्ता बनवण्यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला. प्रवासाचे तासही कमी होणार आहेत. यातील बोगद्याची एकूण लांबी 10.55 किमी, त्यापैकी 2.5 किमी बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून 175 मीटर खालून जातो.  हा आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा असून त्यांची रुंदी 23.75 मीटर आहे. एकूण 2 ब्रीज, एकाची लांबी 900 मीटर तर दुसरा केवळ स्टेन्ड ब्रीज 650 मीटर लांब असेल. प्रकल्प सुरु झाला मार्च 2019 ला तर डेडलाईन आहे डिसेंबर 2023 ची आहे.  


प्रवासाच्या वेळेची बचत
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्यावेळी डिसेंबर 2023 पर्यंत हा होईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तसेच येणाऱ्या काळात नागपूर गोवा समृद्धी महामार्ग, मुंबई सिंधुदुर्ग ग्रीन एक्स्प्रेसवे, असे अनेक प्रकल्प हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी एबीपी माझाला सांगितले. त्यामुळे येत्या काळात अशाप्रकारचे नवे तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेले मार्ग प्रवासाचे तास कमी करेल, अशी अपेक्षा आहे.