पालघर : पालघर जिल्ह्यातील साधूंच्या (Palghar mob lynching case) सामुहिक हत्याकांड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालायाने 10 आरोपींची ओळख न पटल्यानं, पुराव्यांअभावी 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचल्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तर अन्य आठ आरोपींचा त्या हल्ल्यात सहभाग असल्याचं पुराव्यांनिशी निष्पन्न होत असल्याचं स्पष्ट करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निघृणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाकेकडे वर्ग करण्यात आलं. याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयातही राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवाल सादर करण्यात आलं आहेत. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला होता.
जामीन न मिळालेल्या काही आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, त्या रात्री 400 ते 500 जणांच्या जमावानं एकत्रितपणे या हिंसाचारात सहभाग घेतला होता. त्यामुळे, अटक करण्यात आलेल्यांपैकी मोहन गावित, इश्वर निकोळे, फिरोज साठे, राजू गुरूड, विजय पिलेना, रिशा पिलेना, दीपक गुरूड, सीताराम राठोड, विजय गुरूड, रत्ना भवर यांची ओळख न पटल्याने त्यांना 25 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रक्कमेच्या दोन जणांच्या हमीपत्रावर सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला अथवा साक्षीदाराला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष भेटण्याचा, धमकी देण्याचा प्रयत्न करू नये, कोणत्याही पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा विविध अटीशर्ती हा जामीन मंजूर करताना हायकोर्टाकडून घालण्यात आल्या आहेत.
याच प्रकरणातील अन्य आरोपी राजेश राव, रामदास राव, भाऊ साठे, हवसा साठे, राजल गुरूड, महेश गुरूड, लहान्या वालकर, संदेश गुरूड या आरोपींची त्या रात्रीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये, तसेच अन्य काही मोबाईल क्लिपर ओळख पटली आहे. त्यांच्यापैकी अनेकांकडे लाकडी काठ्या, लाकूड, कुऱ्हाडी इत्यादी हत्यारे व्हिडिओमध्ये स्पष्ट आढळून आली आहेत. तसेच हे आरोपी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करताना आणि मृतांना लाठ्या-काठ्या मारतानाही सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेलं होते. इतकंच नव्हे तर हे आरोपी लोकांना या जमावात सामील होण्यासाठी आणि तिन्ही साधूंवर हल्ला करण्यासाठी चिथावतानाही दिसल्याचं आपल्या निकालात नमूद करत पुराव्यांच्या आधारावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी या आठ आरोपींना दिलासा देण्यास नकार देत त्यांची जामीनासाठीची याचिका फेटाळून लावली.
संबंधित बातम्या :
Palghar Mob Lynching Case : पालघर झुंडबळीला घटनेला एकवर्ष पूर्ण; भाजपच्यावतीनं मुंबई, नाशिक, पालघरसह काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा