मुंबई: केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात सुरू केलेल्या कारवाईला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली असल्याचं चित्र आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आता भाजपच्या एका नेत्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची तयारी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. आता हा भाजपचा नेता कोण हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यामध्ये राज्यातील गृहखातं कमी पडत असल्याची तक्रार शिवसेनेकडून केली जात आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर सुरू आहे.
भाजपविरोधात राष्ट्रवादी सॉफ्ट भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. मोहित कंबोज, किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात काही पुरावे असतानाही त्यांच्याविरोधात कारवाई केली जात नाही असा आरोप शिवसेनेकडून केला जात आहे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर मुख्ममंत्री उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा होती.
आज दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि मुख्यमंत्री नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं. स्वत: मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातूनही असा खुलासा केला गेला. मात्र आता संध्याकाळी पुन्हा एकदा दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्याना भेटायला गेले आहेत आणि त्याठिकाणी संजय राऊतही उपस्थित आहेत.
भाजपच्या नेत्यांवर कारवाई करण्यासाठी शिवसेना आक्रमक असून त्यांनी राष्ट्रवादीवर दबाव टाकायला सुरुवात केल्याचं दिसून येतंय. आजची बैठक ही त्यांच संबंधी असून आता भाजपच्या कोणत्या नेत्यावर कारवाई होणार याची चर्चा सुरू आहे. प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या रडारवर आहेत.
महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना जशास तसं उत्तर देण्याच्या मुद्द्यावरुन आता मतभेद होत आहेत. शिवसेनेच्या दबावावरुन आता कोणत्या भाजप नेत्याचा 'करेक्ट कार्यक्रम' होणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल.