मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुखांना ई़डीने चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता मुंबईच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. अनिल देशमुखांना आज ईडीकडून अटक होण्याची शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्सकडून दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपये वसुल करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अनिल देशमुखांवर सीबीआय आणि ईडीने गुन्हा नोंद केला होता. 


वसुली प्रकरणात ईडीने 25 जूनला अनिल देशमुखांच्या घरी छापेमारी सुरु केली होती. त्यांनतर अनिल देशमुखांचे पीए कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पलांडे यांची ईडीने चौकशी करुन त्यांना अटक केली होती. त्यानंतर अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावला होता पण प्रकृतीचे आणि कोरोनाचे कारण सांगून ही चौकशी ऑनलाईन व्हावी अशी मागणी अनिल देशमुखांनी केली होती. 


अनिल देशमुखांनंतर ईडीने ऋषिकेश देशमुखांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. वसुली प्रकरणातील चौकशीपासून आपल्याला दिलासा मिळावा म्हणून अनिल देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून या आठवड्यात त्यावर सुनावणी होणार आहे. 


काय आहे ईडीचा दावा? 
ईडीचा देशमुखांविरोधआत पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. ईडीच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी राज्याचे गृहमंत्री असताना अप्रामाणिक हेतूने मुंबईतील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत विविध ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून अंदाजे 4.70 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढे, दिल्लीस्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख परिवाराने 4.18 कोटींच्या पैशाची उधळपट्टी केली आणि श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टमध्ये प्राप्त झालेली रक्कम दाखवून काळा पैसा कायदेशीर केल्याचा अंदाज आहे. 


ईडीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, वरळी येथील फ्लॅट अनिल देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे आणि या फ्लॅटचे संपूर्ण पेमेंट 2004 साली रोख रकमेच्या माध्यमातून केली गेली. पण या फ्लॅटचा विक्री करार फेब्रुवारी 2020 मध्ये करण्यात आला. पुढे देशमुख कुटुंबाने मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50 टक्के मालकी घेतली आहे. या सोबतच कंपनीची मालमत्ता म्हणजेच जमीन आणि दुकानं ज्यांची बाजारात किंमत अंदाजे 5.34 कोटी आहे, तेही देशमुख परिवाराने 17.95 लाख रक्कम देऊन आपल्या नावावर केली आहे. ईडी या प्रकरणात पुढील तपास करत आहे.


महत्वाच्या बातम्या :