मुंबई : जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली. अशातच महाड, चिपळूण, सांगली, कोल्हापुरातील अनेक गावं पाण्याखाली गेली होती. आज (2 ऑगस्ट) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीत अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालं आहे. कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या पुरामुळं अनेक गावं पाण्याखाली गेली होती. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळं अजूनही सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज ते सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.


कसा असेल मुख्यमंत्र्यांचा सांगली दौरा?


सकाळी 9.50 वा. मुंबईहून कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. 


सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे मोटारीने आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 


सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. 


सकाळी 11.55 वा. कसबे डिग्रज येथे आगमन  व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज,  येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल,  येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. 


दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. 


दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.   


राज्यात पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व सबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच, पण ते अधिक सक्षम करु. अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आज चिपळूणचा दौरा केला. यावेळी त्यांनी पूरपरिस्थितीची पाहणी करुन बाधितांना योग्य ती मदत करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.


ते म्हणाले की, दोन चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल मात्र आता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न औषध कपडेलत्ते व इतर आवश्यक त्या गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत सबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.