मुंबई : सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4 कोटी 20 लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यासंदर्भातील माहिती ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकले  होते. तसेच त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या जप्त संपत्तीमध्ये अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. 


ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त केलेली मालमत्ता ही अनिल देशमुख यांची पत्नी आरती देशमुख यांच्या आणि देशमुख कुटुंबाची कंपनी मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकिची आहे. आरती देशमुख यांच्या नावावर असलेला 1.54 कोटीचा वरळीच्या फ्लॅट आणि कंपनीच्या नावावर धुतूम गांव, उरण, रायगड असेलली 2.67 कोटीची जमीन ईडीने जप्त केली आहे. 






ईडीचा दाव्यानुसार पीएमएलए अंतर्गत केलेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, अनिल देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना अप्रामाणिक हेतूने मुंबईतील तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यामार्फत विविध ऑर्केस्ट्रा बार मालकांकडून अंदाजे 4.70 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुढे, दिल्लीस्थित डमी कंपन्यांच्या मदतीने देशमुख परिवाराने 4.18 कोटींच्या पैशाची उधळपट्टी केली आणि श्री साई शिक्षण संस्थान नावाच्या ट्रस्टमध्ये प्राप्त झालेली रक्कम दाखवून काळा पैसा लीगल केल्याचा अंदाज आहे. 


अनिल देशमुख आणि इतरांविरूद्ध सीबीआयने आयपीसी कलम 120 B, 1860  आणि सेक्शन 7 पीसी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील विविध बार, रेस्टॉरंट्स व इतर प्रतिष्ठानांकडून दरमहा 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्याचा आरोप आहे. 


ईडीने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, वरळी येथील फ्लॅट त्यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे आणि या फ्लॅटची संपूर्ण पेमेंट 2004 साल रोख रकमेच्या माध्यमातून केली गेली. पण या फ्लॅटचा विक्री करार फेब्रुवारी 2020 मध्ये करण्यात आला. जेव्हा अनिल देशमुख गृहमंत्री होते. पुढे देशमुख कुटुंबाने मेसर्स प्रीमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50% मालकी घेतली आहे. या सोबतच कंपनीची मालमत्ता म्हणजेच जमीन आणि दुकानं ज्यांची बाजारात किंमत अंदाजे 5.34 कोटी आहे. तेही देशमुख परिवाराने 17.95 लाख रक्कम देऊन आपल्या नावावर केली. ईडी या प्रकरणात पुढील तपास करत आहे.