Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात (Budget 2024) महिला, शेतकरी, युवक, वारकरी, अल्पसंख्याक सर्वच वर्गांसाठी घोषणा केल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं ही मतपेरणीच केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. अशातच अर्थसंकल्पात सरकारनं महिलांसाठी एका खास योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे, 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' (Chief Minister Ladki Bahin Yojana). या योजनेतंर्गंत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या महिलांना महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना जाहीर झाल्यापासूनच राज्यभरात याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर अनेक त्रुटी दूर करून नव्या बदलांसह या योजनेचे निकष पुन्हा जाहीर करण्यात आले. आता या योजनेसाठी अर्ज करणं आणखी सोपं झालं आहे. 


योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणं आता आणखी सहज आणि सोपं झालं आहे. अद्यापही अनेक महिलांनी यासाठी अर्ज केलेला नाही. अनेक महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाही, तर काही जणींकडे जन्म दाखला नसल्यानं अर्ज करता आलेला नाही. पण आता चिंता करण्याची गरज नाही. सरकारकडून अटी-शर्थी बदलण्यात आल्यामुळे या कागदपत्रांऐवजी इतर ओळखपत्र आणि कागदपत्र देऊन तुम्ही झटपट आणि अगदी सहज या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकणार आहात. 


अर्ज करण्यासाठी मुदत कधीपर्यंत? (When Is Deadline To Apply Ladki Bahin Yojana?)


'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी दिलेल्या मुदतीपर्यंत वयवर्ष 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व पात्र महिला अर्ज करू शकतात. 


दरम्यान, राज्य शासनानं या योजनेंतर्गत अर्ज करण्याची मुदत 15 जुलैपर्यंतची ठेवली होती. या मर्यादेत शासनाने सुधारणा केली असून आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. 


योजनेतील अटी-शर्थींमध्ये काही महत्त्वाचे बदल



  • 'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण' योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 कागदपत्रांपैकी कोणतंही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार आहेत. 

  • 2 लाख 50 हजार रुपये उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल, मात्र कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला देण्याची आवश्यकता असणार नाही.

  • या योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष ऐवजी 21 ते 65 वर्ष अशी करण्यात आली आहे. 

  • परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 

  • या योजनेचा कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलादेखील लाभ देण्यात येणार आहे.


महत्त्वाची बाब म्हणजे, मोबाईल ॲपद्वारे या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रती लाभार्थी 50 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णयही शासनानं घेतला आहे. 


कोण असणार पात्र? (Who Will Be Eligible For Mukhyamantri Ladki Bahin Yojana?)



  • महाराष्ट्र रहिवासी 

  • विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला

  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे

  • 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा


अपात्र कोण असेल? (Who Will Be Disqualified For Ladki Bahin Yojana?)



  • 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे

  • घरात कोणी Tax भरत असेल तर

  • कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर

  • कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर

  • कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )


अर्ज भरताना कोणती कागदपत्रं लागणार?  



  • आधारकार्ड 

  • रेशनकार्ड 

  • उत्पन्नाचा दाखला 

  • रहिवासी दाखला 

  • बँक पासबुक 

  • अर्जदाराचा फोटो

  • अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र

  • लग्नाचं प्रमाणपत्र


योजनेचे अर्ज कुठे आणि कसा भरायचा? 


योजनेसाठीचा अर्ज पोर्टल/मोबाईल अॅप/सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.