ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बदलापूरच्या शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याची ओळख परेड करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने न्यायालयाकडे तसा अर्ज केला आहे. आता त्याची परवानगी मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाने अक्षय शिंदे याच्या ओळख परेडची परवानगी दिल्यास दंडाधिकाऱ्यांसमोर शाळेतील दोन्ही मुलींना आणण्यात येईल. या ओळख परेडवेळी मुलींनी अक्षय शिंदेला ओळखल्यास तो न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
दरम्यान, अक्षय शिंदे याला सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कल्याण कोर्टाने त्याला आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अक्षय शिंदे याच्याविरोधात आरोपपत्रात पॉस्को अंतर्गत कलम 21 आणि 6 वाढवण्यात आले असून कलम 6 मध्ये आरोपीला 10 ते 20 वर्षे शिक्षेची तरतूद आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना बोलावून घेतले
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाची अपडेट घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला न्यायालयाने आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक बोलावली आहे. या बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री पोलीस आयुक्तांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल.
बदलापूर अत्याचार प्रकरणाचा अहवाल सादर
बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नेमण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. तर पोलिसांच्या एसआयटी पथकाकडून आरोपी अक्षय शिंदे याच्या दोन पत्नींची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचीही लवकरच चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
बदलापूर घटनेतील पॉस्को दाखल गुन्ह्यात पॉस्को मधील २१ कलम वाढवण्यात आले आहे. शाळेत घडलेली घटना ज्या शिक्षकांनी लपवली त्यांनी पोलिसांना कळवली नाही अशा सगळ्या दोषी शिक्षक आणि शाळा प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यात नेमके कोण शिक्षक आहेत शाळा व्यवस्थापनाचे पदाधिकारी कोण आहेत याची चौकशी सुरु आहे. बदलापूर शाळेत घडलेल्या प्रकरणानंतर प्राथमिक वर्गातील सर्व महिला शिक्षिकांची पोलिसांमार्फत चौकशी सुरू असल्याचे समजते.
आणखी वाचा