Eknath Shinde : जालना : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला (Ladki bahin yojana) राज्यभरातून तुफान प्रतिसाद मिळाला असून तब्बल दीड कोटींपेक्षा जास्त महिला भगिनींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत. तसेच, सप्टेंबर महिन्यातही महिलांचे अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरू असून राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या योजनेच्या श्रेयवादाची लढाई महायुतीत रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमांतून राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन महिला भगिनींना साद घातली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेही आपल्या प्रत्येक भाषणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांचं योजनेकडे लक्ष वेध आहेत. मात्र, दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही श्रेयवादाचा कलगीतुरा पाहायला मिळत आहे. आता, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील नेते माजी आमदार अर्जून खोतकर यांनी या योजनेत जास्त योगदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असल्याचा दावा केला आहे. त्यावरुन, महायुतीत पुन्हा खटका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


राज्यातील लोकप्रिय योजना ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादाची लढाई थेट मंत्रालयातही पोहोचली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंना चिमटा काढला होता. कारण, राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जाहिरात मुख्यमंत्र्‍यांचा उल्लेख न केल्याने शिवसेना नेते नाराज झाल्याची चर्चा होती. आता, शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांनी थेटच या योजनेत काकणभर का होईना जास्त योगदान हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे, महायुतीत खोतकर यांच्या विधानावरुन कलगीतुरा रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान, आधीच बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बॅनर काळ्या पडद्याने झाकल्यामुळे महायुतीतील या दोन पक्षात वाद होताना पाहायला मिळते.     


दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी काही ठिकाणी महायुतीत तिन्ही पक्ष आग्रही आहेत. जिथे मिटतच नसेल तिथे मैत्रीपूर्ण लढती झाल्या पाहिजेत. सर्वच ठिकाणी एक मत होईल असं शक्य नाही, अनेक जागांवरती तिन्ही पक्ष ओढताण करतील, त्या ठिकाणी विकोपाला न जाता मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी दिली पाहिजे, असे मत अर्जून खोतकर यांनी व्यक्त केलंय. आपलेच कार्यकर्ते दुसऱ्याच्या दावणीला जाऊ द्यायचे नसेल तर मैत्रीपूर्ण लढती केल्या पाहिजे, असेही ते म्हणाले. 


महायुतीत समसमान जागा लढाव्यात


महायुतीमध्ये सर्वांनी समसमान जागा लढल्या पाहिजे. आमच्या वाटेला जास्त जागा आल्या पाहिजेत हा आमचा आग्रह आहे. एकमेकांच्या ताकती शिवाय कोणीच पुढे जाऊ शकणार नाही, एकट्याच्या बळावर सरकार आणने ही गोष्ट आता इतिहास जमा झालीय. सरकार आणायचं असेल तर तिघांना समन्वयानेच पुढे जावे लागेल, असेही खोतकर यांनी म्हटले. 


हेही वाचा


गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी