पुणे : सध्या अनेक तरुणांना सरकारी नोकरी आणि स्थैर्य अशा दुहेरी अपेक्षा असतात. सरकार दरबारी काम करण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणवर्गाला आता 'हमाल' या पदाचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीतील हमालपदाच्या जागांसाठी ढिगाने अर्ज आल्यामुळे आता या पदासाठीही परीक्षा घेण्याची निर्णय आयोगाने घेतला आहे.


 
विशेष म्हणजे आलेल्या अर्जामध्ये अनेक पदवीधरांचाही समावेश असल्याचे आयोगातील अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. खासगी क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या असल्या तरी सरकारी नोकरीतील स्थैर्य अजूनही तरुणांना भुरळ पाडत आहे. याचाच अनुभव सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला येत आहे.

 

 

आयोगाच्या कार्यालयात सध्या हमाल या पदाच्या पाच जागा आहेत. ‘ड’ गटातील या पदासाठी डिसेंबर 2015 मध्ये जाहिरात दिली होती. या पदासाठी 18 ते 33 वर्षे वयोगटातील किमान चौथी पास झालेल्या उमेदवारांची भरती होणार आहे. मात्र या पदासाठी साडेचारशे ते पाचशे अर्ज आले. महत्त्वाचं म्हणजे त्यात केवळ चौथी उत्तीर्णाची संख्या कमी असून पदवीधरांचं प्रमाण अधिक आहे.

 
नियमानुसार चौथीच्या अभ्यासक्रमावरच ही परीक्षा होणार आहे. त्यासाठी भाषा, गणित, बुद्धिमापन चाचणी, सामान्यज्ञान असे चार विषय आहेत. भाषेचा वापर, व्याकरण, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार असे प्राथमिक अंकगणित आणि उमेदवार निर्णय घेऊ शकतो का, कशा प्रकारे विचार करतो याचे मोजमाप करण्यासाठी बुद्धिमापन चाचणी अशी शंभर गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

 

परीक्षेतून पात्र झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्यानंतर हमाल पदासाठी भरती करण्यात येणार आहे. चौथीपेक्षा जास्त शिकलेल्या उमेदवारांना अगदी पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचीही संधी आहे. त्यामुळे चाळणी परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरण्यासाठीही तीव्र स्पर्धा असणार आहे.