Success Story : मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच जीवनात कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. याचेच उदाहरण बारामतीत दिसून आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पीएसआय पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांची मुलं फौजदार झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश मिळविले आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर या दोन्ही तरुणांनी यश मिळवत बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


मजुरांची मुलं झाली फौजदार, जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी
बारामती शहरात राहणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांच्या दोन मुलांनी राज्य लोकसेवा आयोगा मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये यश मिळविले आहे. आमराईत राहणारी सुरज सुभाष मोरे आणि शुभम मिलिंद शिंदे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघेही अतिशय सामान्य कुटुंबातील आहेत. सुरजचे वडील हे सेंट्रिंगचे काम करतात, तर शुभमचे वडील हे गॅरेजमध्ये कामाला आहेत. कुटुंबांची परिस्थिती बेताची असताना देखील या दोघांनी बुद्धी कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. 


फटक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण
बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. या दोघांच्या यशानंतर आमराई परिसरातील शेकडो नागरिकांनी फटक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण केली. त्यांची घोड्यावरून भव्य मिरवणूक काढून त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. इतके वर्षे जी लोक बारामतीतील आमराई परिसराकडे वाईट दृष्टीकोनातून बघत होती. त्या लोकांसाठी सुरज आणि शुभम चे यश हे एक चपराक असल्याची भावना आमराई परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात होती.


संबंधित बातम्या :