मुंबई: पात्र खेळाडू असल्याचा दावा करत एमपीएससीमधून (MPSC) नायब तहसिलदार पदावर निवड झालेल्या दोन नायब तहसिलदारांची निवड आयोगाने रद्द ठरवली आहे. अनिल बाबुराव पाटील आणि जयश्री गोविंद नाईक असं या दोघांची नावं आहेत. एमपीएससीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 


अनिल बाबुराव पाटील आणि जयश्री गोविंद नाईक या दोघांनी आपण परीक्षेसाठी पात्र खेळाडू असल्याचा दावा करत खेळाडूंसाठी आरक्षित असलेल्या कोट्यातून (MPSC Sports Reservation Quota) पदं घेतली होती. 2019 सालच्या राज्यसेवा आयोगाच्या यादीत या दोघांचीही नावं होती. आता त्यांचा दावा खोटा असल्याचं समोर आल्यानंतर एमपीएससीने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाची फसवणूक केल्याबद्दल या दोघांचीही निवड रद्द केल्याचं आयोगाने म्हटलं आहे. 


एमपीएससीने एक ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, राज्यसेवा परीक्षा 2019 मधून नायब तहसीलदार पदावर निवड झालेले उमेदवार अनिल बाबुराव पाटील व जयश्री गोविंद नाईक यांनी पात्र खेळाडू असल्याचा खोटा दावा करुन आयोगाची फसवणूक केल्याबद्दल त्यांची शिफारस रद्द करण्यासह त्यांना कायमस्वरूपी प्रतिरोधित  करण्यात आले आहे.


 






MPSC Sports Reservation Quota : खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण 


एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये इतर आरक्षणासोबत खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये एखाद्या खेळाडूने जर आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल जिंकलं असेल तर त्याला वर्ग एक पदांसाठी पात्र समजलं जातं. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलिस उपाधीक्षक, तहसिलदार आणि इतर वर्ग एक पदांचा समावेश असतो. 


जर खेळाडून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत मेडल जिंकलं असेल तर त्याला वर्ग दोन म्हणजे नायब तहसिलदार आणि इतर पदांसाठी पात्र समजलं जातं. जर खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मेडल जिंकलं असेल तर त्याला वर्ग तीन पदासाठी पात्र समजलं जातं. 


ही बातमी वाचा :