MPSC Final Result 2019 : यूपीएससी पाठोपाठ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2019 (एमपीएससी) चा अंतिम निकाल  जाहीर केला आहे. साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम अव्वल आला आहे. तर मानसी पाटील मुलींमध्ये प्रथम आली आहे.  मागील अनेक दिवसांपासून हे उमेदवार एमपीएससीकडे निकाल लावण्याची मागणी करत होते अखेर काल निकाल जाहीर करण्यात आला आहे. 


जळगावच्या असलेल्या मात्र सध्या नाशिकमध्ये स्थायिक असलेल्या मानसी पाटीलने महाराष्ट्रातून मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला असून सध्या तिच्यावर नातेवाईक आणि मित्र मंडळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. या परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. जून 2020 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवड तर झाली मात्र त्यानंतर अनेक कोर्ट केसेसमध्ये निकाल अडकला आणि दीड वर्षांनंतर आज अखेर आम्ही बाहेर पडलो अशी प्रतिक्रिया तिने एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली. प्रशासनात चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचं मानसीनं म्हटलं आहे. 


MPSC Results Announced : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात प्रथम


दीड वर्षांनंतर आम्ही बाहेर पडलो
एबीपी माझाशी बोलताना मानसी पाटीलनं म्हटलं की, सुधारित निकालात मला हे यश मिळालंय.  यापूर्वीच्या निकालात मी दुसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली होती.   मुलींमध्ये पहिला येण्याचा आनंद आहेच. 19 जून 2020 ला उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली पण त्यानंतर आमचा 413 विद्यार्थ्याच्या बॅचचा संघर्ष मोठा होता.  अनेक कोर्ट केसेसमध्ये निकाल अडकला आणि दीड वर्षांनंतर आम्ही बाहेर पडलो, असं मानसी म्हणाली. 


मानसीनं म्हटलं आहे की, 2015 पासून अभ्यासाला सुरुवात केली होती, स्वतःला शोधत, चुका सुधारत इथपर्यंत प्रवास केला. कळत्या वयापासून स्वप्न बघितले होते, घरची पण प्रशासकीय कामातील पार्श्वभूमी आहे.  ग्रामीण भागातून असल्याने हे क्षेत्र निवडले आणि प्रयत्न सुरु केले.  आई, वडील आणि एकत्र कुटुंबाचा यात खूप मोठा वाटा आहे. माझ्या मित्र मैत्रिणींनी खूप सपोर्ट केला. पुढे Upsc चा प्रयत्न करेल पण सध्या या पदावर राहून चांगलं काम करण्याचा नक्की प्रयत्न राहील, असं मानसी म्हणाली.