औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह (Marathwada Rain Update)  राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांना देखील मोठा फटका या पावसामुळं बसला आहे. मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंग तसेच अॅग्रीसाठीच्या सीईटी परीक्षेपासून वंचित राहावं लागलं आहे. 200 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला असून विद्यार्थ्यांनी आम्हाला पुन्हा संधी मिळावी अशी मागणी केली आहे. ही परीक्षा 20 तारखेपासून 1 तारखेपर्यंत सुरू आहे.  काल ज्यांचे पेपर होते त्यातील अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले असून आजही अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. 


Maharashtra Rain LIVE Update : मराठवाडा, विदर्भासह राज्यभरातील पावसाचे अपडेट्स एका क्लिकवर...


विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये- सीईटी सेल


मुसळधार पावसामुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा परीक्षा घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नये, अशी माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना काल आणि आज राज्यभरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीईटी  परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाला आहे, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे.  ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्या विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे मेल करावा, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा लवकरच घेतली जाईल. विद्यार्थ्यांनी परीक्षा न देता आल्याने जास्तीचा ताण घेऊ नये, अशी माहिती सीईटी सेल कडून देण्यात आली आहे.


अनेकांची एमएचटी- सीईटी परीक्षा हुकली
काल सकाळी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरु होता. औरंगाबादमधील एव्हरेस्ट कॉलेज परीक्षा केंद्रावर होणाऱ्या एमएचटी- सीईटी परीक्षा सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात होती. सकाळी 300 विद्यार्थ्यांपैकी 254 विद्यार्थी परीक्षेला हजर होते तर  46 विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले. दुपारी 2 वाजता होणाऱ्या  सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दुपारी दीड वाजता पोहचणे गरजेचे होते. परंतु पावसाचा जोर आणि हर्सूल तलावाच्या ओव्हरफ्लो मुळे रस्ता बंद झाला. यामुळे या परीक्षा केंद्रावर 300 विद्यार्थ्यांपैकी फक्त 131 विद्यार्थी हजर होते तर  169 विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली. दरम्यान, पावसामुळे अनेकांना  परीक्षा देता आली नाही अशा मुलांची तसेच झालेल्या परिस्थितीची माहिती सीईटी सेलला पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.


औरंगाबादमध्ये झालेल्या जोरदार पावसाने जटवाडा रोड वरील बंधारा फुटला त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. आज जटवडा  येथील एव्हरेस्ट कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये सीईटी 2021 ची परीक्षा देण्यासाठी या सेंटरवरील सर्व विद्यार्थी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या परीक्षेचं काय? हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. केवळ औरंगाबादच नाही तर नांदेड आणि इतर मराठवाड्याच्या भागातूनही विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पोचले होते. त्यातील नांदेड येथून आलेल्या एका विद्यार्थ्यांनी आपण कसे अडकलो आणि सेंटरपर्यंत पोहोचू शकलो नाहीत याची कैफियत सांगितली.


हिंगोलीतही सीईटी द्यायला जाणारे पंचवीस ते तीस विद्यार्थी पावसामुळे अडकले आहेत.  नऊ वाजता  विद्यार्थ्यांची सीईटीची परीक्षा होती.  लातूर जवळील मांजरा नदीच्या पुलावर पाणी आल्याने भातखेडा गावाजवळ परिवहन मंडळाची बस अडकली. या बसमध्ये हिंगोली आणि नांदेडहून विद्यार्थी परीक्षेसाठी सोलापूरला जात आहेत.  परीक्षा द्यायला जाणारे 25-30   विद्यार्थी यात अडकले  असल्याची माहिती आहे.