मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचे विचार दिले. आज सर्वच पक्ष महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करतात. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना अभिवादन केलं जातं. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करतो असं सांगतिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव फक्त राजकारणासाठी घेतले जात आहे. परंतु. त्यांच्याबाबत कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर कोणाला राग कसा येत नाही. महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते त्यावेळी देखील यांना कोणालाच राग का येत नाही. महाराजांची अशी प्रतिमा तयार केली तर पुढच्या पिढीला महाराज असे होते असेच वाटेल. आता जनतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पुण्यात शिवप्रेमी संघटनांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराजांची प्रतिमा मलिन केली जात असल्याबाबत खंत व्यक्त केली. राजकीय स्वार्थासाठी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वक्तव्य केली जात आहेत. परंतु, त्यांच्याबाबत गलिच्छ कोणी बोलले तर त्यांच्यावर कारवाई होत नाही, याबाबत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला.
राज्यपालांच्या वक्तव्यावरून उदयनराजे आज खूपच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. देशात सध्या सुरू असलेलं विकृतीकरण थांबवलं पाहिजे. शिवाजी महाराजांबाबत जर कोणी वेडं वाकडं बोलत असेल आणि राजकीय नेते शांत बसत असतील, शिवाय अशा लोकांवर कारवाई करत नसतील तर महाराजांचं नाव घेण्याचा कोणाला अधिकार नाही, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी घेतली.
उदयनराजे भावूक
दरम्यान, उदयनराजे पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक भावूक झाले. छत्रपतींचा अवमान होत असल्याचे पाहून मनाला वेदना होतात. महाराजांचा अपमान होत असेल तर कोणाच्याही डोळ्यात अश्रु येणारच. शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर इथं आलेल्या प्रतेकाची हीच भावना आहे. मी हतबल आहे असं समजा. कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. असे सांगताना ते भावूक झाले. जर महाराजांची प्रतिमा मलिन होत असेल आणि प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई होत नसेल तर विमानतळांना महाराजांची नावं का द्यावीत? शिवाजी महाराजांची जयंती तरी का साजरी करायची? असा प्रश्न यावेळी उदयनराजे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या