Governor Bhagat Singh Koshyari: मागील काही महिन्यांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे म्हटले जात आहे. 


राज्यपाल भगतसिंह यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य करताना, शिवाजी महाराज हे जुन्या काळातले नायक होते, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते. भाजप वगळता इतर सर्व पक्षांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय, छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी छत्रपती यांनीदेखील राज्यपालांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. 


राज्यपालांसंमोर पर्याय काय?


आपल्या पदाचा राजीनामा अथवा पदमुक्त होण्याबाबतचे पत्र राज्यपालांना राष्ट्रपतींना पाठवावे लागेल. त्यानंतर त्यांच्या पत्रावर कार्यवाही होईल. केंद्र सरकारकडून राज्यपाल यांची बदली होऊ शकते. मात्र, ही बदली होणे म्हणजे राज्यपालांवरील कारवाई करण्यात आली, असे संकेत देशभरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यपालांकडून स्वत: हून पदमुक्त होण्याची इच्छा राष्ट्रपतींकडे व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.


राज्यपाल नेमके काय म्हटले होते?


औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपालांनी आपल्या भाषणात वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले होते की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले. 


राज्यपालांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आधीदेखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विविध स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही वक्तव्य केले होते. त्यानंतर मुंबईतील एका चौकाचे उद्घाटन करताना कोश्यारी यांनी गुजराती आणि राजस्थानी समुदायामुळे मुंबईला महत्त्व मिळाले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर  राज्यपालांवर चहुबाजूने हल्लाबोल झाला होता. त्यानंतर राज्यपालांनी दिलगिरी व्यक्त केली होती.