Ajit Pawar Pune : राज्यपाल या पदावर बसणारे व्यक्ती (Bhagat shingh koshyari) वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यावेळी त्यांना पदावर बसवणाऱ्या व्यक्तींनी राज्यपालांना काही सल्ले दिले पाहिजे. त्यांनी आजपर्यंत अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. एकदा घडलं तर समजू शकतो मात्र सातत्याने अशी वादग्रस्त वक्तव्ये करतात. त्यामुळे त्याचं लंगडं समर्थन करण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असं टीका विरोधीपक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी केली आहे.
रोज अनेक नेते वक्तव्य करत असतात. त्यात अनेकांडून अनावधानाने चुकून एखादं विधान केलं जातं. त्यानंतर त्या विधानाबाबत अनेक नेते दिलगिरी देखील व्यक्त करतात. मात्र राज्यपालांकडून सातत्याने अशी वक्तव्य केली जातात. ही चूकीची बाब आहे. मला आता माझ्या राज्यात परत जाऊन द्या, असं राज्यपालही खासगीत बोलतात. त्यामुळेच अशी वक्तव्ये राज्यपाल करत आहेत का? हे अजून स्पष्ट झालं नाही, असंही ते म्हणाले.
'लवकरात लवकर निवडणूका घ्या'
राज्यातील निवडणुका सतत लांबत आहेत. मागील फेब्रुवारीमध्ये राज्याच्या स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं मात्र तरीही निवडणुका जाहीर करण्यात आल्या नाहीत. सत्ताधाऱ्यांनी मिळून निवडणुकांबाबतचा निर्णय घेतला पाहिजे. या निवडणुकांमध्ये लहान कार्यकर्त्यांना देखील अनेक संधी मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी तारीख पे तारीख न करता निवडणुका जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
'महागाई आणि बेरोजगारीवर बोला'
देशात महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्वाचे प्रश्न असाताना बाकी गोष्टींवरुन राजकारण सुरु आहे. राजकारण आणि चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात अनेक महत्वाचे विषय आहेत. शेतकाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न आहेत. ग्रामीण भागात अनेक प्रश्न आहे. पिक विमा, रबी हंगामात शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानीचे प्रश्न आहेत. यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सीमावादाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय द्यावा
कर्नाटक आणि महाराष्ट्र यात सुरु असलेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या वतीने या प्रश्नासाठी नेमलं आहे. दोघेही वकिलांशी चर्चा करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कारण नसताना कटूता निर्माण होतील, असे वक्तव्य करत आहेत. दोन राज्यात काहीही झालं तरी कटूता निर्माण होता कामा नये, दोन्ही राज्यकर्त्यांनी आपली राज्य चालवावी. दोघांच्या वतीने सीमावादाची सर्वोच्च न्यायालयात केस सुरु आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने योग्य निर्णय द्यावा, असंही ते म्हणाले.