Nawab Malik Arrest: राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज ईडीकडून अटक करण्यात आलं. मलिक यांच्या घरी बुधवारी सकाळच्या सुमारास ईडीने धडक दिली होती. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली. दरम्यान मलिक यांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्वीट करत संतप्त प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या या कारवाईला 'अफझलखानी वार' अशी प्रतिक्रिया दिली आहे.


अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मलिकांची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. दुसरीकडे राष्ट्रवादीने मलिकांनी कोणतंच चूकीचं काम केलं नसल्याने त्यांचा राजीनामा घेणार नसल्याचं सांगितलं आहे. अशात सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात असून संजय राऊत यांनीही ट्वीट केलं आहे.


काय म्हणाले संजय राऊत?


संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू. कंस आणि रावण सुध्दा मारले गेले. हेच हिंदुत्व आहे. जय महाराष्ट्र!' दरम्यान संजय राऊत यांनी या प्रतिक्रियेतून मलिकांचा राजीनामा घेऊ नका असं सांगितलं असून राष्ट्रवादीकडूनही मलिकांचा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.



काय आहे नेमकं प्रकरण? 


मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आज मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: