MP Sambhaji Raje Chhatrapati Protest For Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या, या मागणीसाठी खासदार संभाजीराजे 26 फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित याबाबत आधीचं त्यांनी सूचित केले होते. आता संभाजी राजे यांनी ट्वीट करत महाराष्ट्रभरातून आंदोलनाला येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, अशी रोखठोख मागणी केली आहे. कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे, पण आगामी काळातील धोका लक्षात घेता बीएमसी प्रशासन काय निर्णय घेणार? हे येणारा काळच ठरवेल.
छत्रपती संभाजी राजे यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान येथे जरी मी एकट्याने उपोषणास बसायचा निर्णय घेतला असला तरी, महाराष्ट्रभरातून तिथे येणाऱ्या मराठा बांधवांना पोलिस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये, ही विनंती !’ संभाजी राजे यांनी ट्विटमध्ये महाराष्ट्र पोलीस, गृहमंत्री वळसे पाटील, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटलेय?
"5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाकडे समाजाच्या वतीने आम्ही काही मागण्या केल्या होत्या. 17 जून 2021 रोजी आपल्या उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत आपण या सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र आज आठ महिने उलटले तरी या मागण्यांच्या अंमलबजावणी बाबत कोणतीही प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसत नाही." आणखी एका ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलंय की, "यामुळे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी या मागण्यांची ठोस अंमलबजावणी होईपर्यंत 26 फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथे मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे."