मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असताना दररोज कोरोनावरील औषध निर्मितीबद्दल काही ना काही दावे केल्याचे समोर येत आहे. कोरोनावर काही औषधं परिणामकारक ठरत असल्याचा दावा काही कंपन्या तसेच डॉक्टरांनी केला आहे. मात्र यातील एका औषधावर डॉक्टर असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनी आक्षेप नोंदवला आहे. फॅबीफ्लू नावाच्या औषधावर त्यांनी आक्षेप नोंदवले असून त्यांनी याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक सविस्तर पत्र देखील लिहिलं आहे. यासंदर्भात खासदार कोल्हे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. 'ग्लेनमार्क' कंपनीच्या 'फॅबिफ्ल्यु'बाबतच्या दाव्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तातडीने पावले उचलावीत आणि निर्बंध आणावेत. तसेच 'डीसीजीआय', आयसीएमआर मार्फत जाहीर चर्चा घडवून आणावी, अशी विनंती डॉ. कोल्हे यांनी पत्रात केली आहे.


आपल्या ट्विटमध्ये कोल्हे म्हणतात की, ग्लेनमार्क फार्मा या औषध कंपनीने कोविड-19 वर फॅबीफ्लू नावाचे औषध बाजारात आणले आहे. परंतु या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. त्यामुळे याची किंमत कमी करावी अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केली आहे. ही कंपनी चुकीचे दावे करीत असून त्यांना यापासून रोखावे अशीही मागणी या पत्रात केली आहे. ही कंपनी सदर औषध कोरोनासंक्रमित मधुमेहग्रस्त रुग्णांनाही लागू पडत असल्याचा व यावर केवळ हेच एक औषधच रामबाण असल्याचा दावा करीत आहे. पण हे दोन्ही दावे आणि क्लिनिकल ट्रायल्स यात तफावत असल्याचे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले, असल्याचे कोल्हे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कोल्हे यांनी आरोग्य मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हे औषध लोकांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून द्यावं, अशी विनंती केली आहे.


आरोग्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात कोल्हे यांनी काही आक्षेप नोंदवले आहेत. यात त्यांनी प्रामुख्याने या औषधाची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याचे म्हटलं आहे. तसंच फॅबिफ्ल्युच्या चाचणी दरम्यान अन्य औषधांचाही वापर होतो. प्रकृती स्थिर असलेल्या आणि दोनच सौम्य लक्षणे आणि चार मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवरच ही चाचणी झाली आहे. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल 94 टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्यांना या चाचणीतून वगळण्यात आले आहे. ज्या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह आदी प्रकारचे आजार आहे, त्यांच्यावर फॅबीफ्ल्यु चाचणीचा परिणाम काय झाला आहे, याची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. अत्यवस्थ असलेल्या रुग्णांवर फॅबीफ्ल्युचा काय परिणाम झाला आहे, हे स्पष्ट नाही, असं कोल्हे यांनी म्हटलं आहे.

कोल्हे यांनी म्हटलं आहे की, कंपनीच्या म्हणण्यानुसार रुग्णांना 14 दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील. 14 दिवसांत रुग्णांनी 122 गोळ्या खायच्या आहेत. त्या सर्व गोळ्यांचा एकूण खर्च 12 हजार 500 रुपये होत आहे. एवढी किंमत सर्वसामान्यांना परवडणार आहे का? असा सवाल अमोल कोल्हेंनी केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील रुग्णावर याची चाचणी घेण्यात आल्याचं कंपनीनं सांगितलं आहे. पण औषधाची किंमत ठरवताना गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांचा विचार केलेला दिसत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोरोना संसर्गावर 103 रुपयांची गोळी प्रभावी; ग्लेनमार्क कंपनीचा दावा

काय आहे ग्लेनमार्क कंपनीचा दावा
'ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स’ या औषध कंपनीने फॅबीफ्लू (FabiFlu) या ब्रँडखाली भारतात अँटीव्हायरल औषध फॅविपिरावीर (Favipiravir) लाँच केले आहे. कोरोना संसर्गाची सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांवर हे औषध प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ‘भारतीय औषध महानियंत्रक’ (DCGI) संस्थेकडून औषध उत्पादन आणि वितरणाची परवानगी मिळाली असल्याचे मुंबईतील कंपनीने सांगितले आहे. कोरोना संसर्गावरील उपचारासाठी अशा प्रकारची मंजुरी मिळालेले ‘फॅबीफ्लू’ हे गोळ्यांच्या रूपात सेवन करता येणारे पहिले ‘फॅविपिराविर’ औषध आहे, असा कंपनीचा दावा आहे. औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे यात औषधाच्या एका गोळीची साधारण किंमत 103 रुपये आहे. या औषधाचे पहिल्या दिवशी 1800 मिलिग्रॅमचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. त्यांनतर 14 दिवसांपर्यंत 800 मिलिग्रॅमचे दोन डोस दररोज घ्यायचे आहेत.