चंद्रपूर जिल्ह्यात दारू तस्करी करण्यासाठी आयशर टॅम्पो मॉडीफाय; तब्बल 10 लाखांची दारू जप्त
सारंग पांडे, एबीपी माझा | 25 Jun 2020 11:15 PM (IST)
चंद्रपूर जिल्ह्यात मॉडीफाय केलेल्या आयशर टॅम्पोतून तस्करी केली जाणारी तब्बल 10 लाखांची दारू चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कारवाई करत जप्त केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
चंद्रपूर : दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. याच कारणामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी दारू तस्करीसंदर्भात चंद्रपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशातच आता चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील मुल मार्गावर कारवाई करत तब्बल 10 लाखांची दारू जप्त केली आहे. दारू तस्करी करण्यासाठी या वाहनात विशिष्ट कप्पा करण्यात आला होता. मात्र, चाणाक्ष पोलिसांनी हा कप्पा बरोबर शोधून काढला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथून चंद्रपूर शहरातल्या बाबुपेठ भागात दारूसाठा येणार असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी एका विशिष्ट वाहनावर लक्ष केंद्रित केले होते. शहराच्या हद्दीत हे वाहन येताच हे वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. यात धक्कादायक म्हणजे आयशर या मालवाहक गाडीच्या मागील भागात दारू तस्करीसाठी एक विशेष कॅबिनचं तयार करण्यात आले होते. अत्यंत बेमालूमपणे तयार करण्यात आलेल्या या केबिनमुळे हा मालवाहतूक सामान्य ट्रक असाच कुणाचाही समज होत होता. मात्र, पोलिसांनी ही केबिन हुडकून काढत त्यातील 100 पेट्या देशी दारू जप्त केली. वड पाच्ची! लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी दारूची दुकानं फोडली दारुची तस्करी करण्यासाठी लढवतायेत शक्कल या प्रकरणी उमरेड येथील प्रकाश वावडे नामक एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान बाबुपेठ येथील आशिष चांदेकर नामक दारू तस्कराकडे ही दारू उतरविली जाणार होती. हा तस्कर सध्या फरार झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यापासून दारू तस्कर विविध शक्कली लढवत चंद्रपुरात दारू तस्करी करत आहेत. आज एका नव्या युक्तीवर मात्र ताज्या कारवाईने प्रकाश पडला. Special Report | लॉकडाऊनच्या मंदीत शोधली संधी! गोशाळेतील दुधातून रत्नागिरीच्या कदमांची चांगली कमाई!