सातारा :  ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातून मतांमध्ये फरक आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये राज्यात देखील अनेक पराभूत उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र आता सातारा लोकसभेतून विजयी झालेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही मतमोजणीतील फरकावरून टीका केली आहे.


ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान आणि मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे. तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या, मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे
खासदार छत्रपती उदयनराजे यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे.



प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सर्वसामान्यांच्या खिशातून टॅक्‍सच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशाचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. एक हजार मतदानासाठी बॅलेट पेपरसाठी एक हजार 300, तर ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी 33 हजार रुपयांचा खर्च येतो. या निवडणुकीतच साडेचार हजार कोटींपेक्षा जास्त खर्च ईव्हीएमवर मतदान घेण्यासाठी केला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोणतीही मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहिती असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत. असे असताना त्या विषयातील तज्ज्ञ नसतानाही न्यायालये ईव्हीएमबाबत आग्रही राहत आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?, असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा केला पाहिजे, असेही खासदार छत्रपती उदयनराजे यांनी म्हटले आहे.



माझ्याच लोकसभा मतदार संघात वाई मतदारसंघात 344, कोरेगावमध्ये पाच, कऱ्हाड उत्तरमध्ये 148, कऱ्हाड दक्षिणमध्ये पाच, पाटणमध्ये 97, तर सातारा मतदार संघात 75 मतांचा फरक आला आहे. अशाच प्रकारे देशातील 376 मतदार संघात झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाच्या साईटवरील माहितीतही तफावत असल्याचे स्पष्ट झाल्यावर ती माहितीच काढून टाकण्यात आली. वायरसमुळे माहिती गेली असे आयोग म्हणतो. मग, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार?, असा सवाल खासदार छत्रपती उदयनराजे यांनी केला आहे.