सांगली  : आईलाच देवी मानून उपासना करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील अवलियाची सगळीकडे चर्चा आहे. हिंगणगाव खुर्द या गावी या अवलियाने घराशेजारीच त्याने आईचे मंदिर बांधले आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या जागी आईच्या मूर्तीची ठेवून पूजाअर्चा  केली जाते. अशोकराव शिवाजी  वायदंडे असं त्यांचं नाव आहे.


'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी'ही ओळ लिहून कवी यशवंत यांनी आई या शब्दाची महानताच आपल्या कवितेतून सांगितली आहे. अशाच प्रकारे आईची महानता लक्षात घेऊन हिंगणगाव खुर्द तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील अशोक वायदंडे यांनी  आपल्या आईचे मंदिर बांधले असून आईलाच देवी मानून ते तिची उपासनाही करीत आहेत.


अशोक  वायदंडे यांचा अत्यंत गरीबीची परिस्थिती असणाऱ्या घरात जन्म झाला. मात्र मनाने श्रीमंत असणाऱ्या हरुबाई नावाच्या त्यांच्या आईने त्यांना व त्यांच्या भावंडांना गरीबीची जाणीव होऊ न देता जपले व चांगले संस्कार केले. त्या अतिशय अध्यात्मिक स्वभावाच्या होत्या. देवावर विश्वास ठेव, देव प्रत्येक संकटातून आपल्याला तारत असतो अशा अनेक गोष्टी त्या अशोकराव यांना सांगत होत्या. मात्र तूच माझा देव व तूच माझे सर्वस्व आहेस असे अशोकराव आईला म्हणत असत.


अशोकराव सांगतात, आईसाठी नवरात्रोत्सव म्हणजे आराधनेचा काळ होता. 4 ऑक्टोबर 2000 रोजी  नवरात्र उत्सवाच्या सातव्या दिवशी हारुबाईंनी  पूजा व आरती केली  आणि मला  जाण्याची वेळ आली. मला जावे लागेल, मी जाणार…!  असे  सांगितले आणि त्यांचे  देहावसान झाले. अशोकरावांची आई निघून गेली मात्र मातृशोकातून धीरोदात्तपणे बाहेर येऊन ते मुंबईला गेले आणि तिथे सुरक्षा रक्षकांची नोकरी पत्करली. पुढे त्यांनी स्वतःची सुरक्षारक्षकांची कंपनी स्थापन केली. आता एक्स्पोर्ट आणि इम्पोर्टची कंपनीही त्यांनी सुरू केली आहे.


आईच्या आशीर्वादाने त्यांचा व्यवसायात चांगला जम बसला. यामुळे त्यांनी 2011 मध्ये कळंबोली मुंबई येथे कंपनीत आणि त्यानंतर सन 2015 मध्ये  जन्मगावी  हिंगणगाव येथेही आईचे आकर्षक मंदिर बांधले. आईचे दर्शन आणि पूजा झाल्याखेरीज ते दैनंदिन कामकाजाला सुरुवात करीत नाहीत. त्यांच्या पत्नी  संध्या यासुद्धा आईच्या मंदिरातील पूजा, नवरात्रोत्सवातील उपासना सर्व काही मंत्रमुग्ध होऊन करतात. आई हरुबाईच्या नावावरून त्यांनी माता हरीओम नावाने त्यांचे मंदिर स्थापन केले आहे. त्यांची हुबेहूब मूर्ती देखील स्थापन केली आहे. नवरात्रात देवी ऐवजी ते आईच्या मूर्तीचीच पूजा करतात.