परभणी : मॉर्निंग वॉक करणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले असते. मात्र तुम्ही जर महामार्गावर मॉर्निंग वॉक, रनिंग करत असाल तर ते जीवघेणे ठरू शकते. परभणीत महामार्गांवर दोन वेगवेगळ्या घटनांत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे परभणीत मॉर्निंग वॉक जीवघेणा ठरत असल्याचं दिसून येतंय. 


दळणवळण सोयीस्कर व्हावे यासाठी सर्वत्र महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग बांधले गेलेत. रस्ते उत्तम दर्जाचे, गुळगुळीत असतात. यामुळेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने  शहराबाहेर जाऊन याच महामार्गावर मॉर्निंग वॉकला जातात. शिवाय याच महामार्गावर असलेल्या गावातील गावकरी ही पहाटे फिरायला जातात. मनमोकळ्या गप्पा आणि फिरणे म्हणजे ही एक मैफिलच झालेली असते. अनेक जण पहाटे-पहाटे अंधारातच फिरायला जातात जे धोकादायक ठरत आहे. 


आज पहाटे परभणीच्या मानवत तालुक्यातील पाथरी-परभणी महामार्गावर असलेल्या केकरजवळा येथील पोलीस पाटील उत्तम लाडाने, आत्माराम लाडाने, नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने हे चौघेजण नेहमी प्रमाणे पहाटे चार वाजता याच रस्त्यावर पाथरीकडे मॉर्निंग वॉक करत करत निघाले. गावापासून पुढे काही अंतरावर गेल्यानंतर पाथरी कडून परभणीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने या चारही जणांना अक्षरशः चिरडले आणि तो वाहन चालक पसार झाला. 


अगोदरच सर्वत्र अंधार आणि त्यात ही घटना घडली. काही मिनिटांपूर्वी जे चौघेजण एकमेकांशी बोलत चालले होते त्यातील पोलीस पाटील उत्तम लाडाने आणि आत्मराम लाडाने यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदकिशोर लाडाने व राधेश्याम लाडाने हे दोघे जण गंभीर जखमी झाले. उजेड पडल्यावर ही घटना गावकरी, पोलिसांना समजली आणि मग नंदकिशोर लाडाने व राधेश्याम लाडाने यांना तात्काळ परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तीन वर्षांपूर्वीच असंच पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील चार तरुण पोलीस भरतीसाठी प्रॅक्टिस करत होते. तेही पहाटे 4 वाजताच उठून गावात इतर सुविधा नसल्याने महामार्गावर रनिंग, व्यायाम करत होते. रस्त्याच्या शेजारी व्यायाम करत असताना या चौघांना मुंबईकडून-नांदेडला जाणाऱ्या भरघाव वाहनाने चिरडले. ज्यात या भावी पोलिसांचा जागीच मृत्यू झाला होता. या दोन घटनेत परभणीतील सहा जणांचा जीव गेलाय. त्यामुळे पहाटे-पहाटे महामार्गांवर मॉर्निंग वॉक,व्यायाम करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.


महामार्गांवर मॉर्निंग वॉक, व्यायाम करणे योग्य आहे? 
शक्यतो पहाटे अंधारात कुठल्याही महामार्ग वा मार्ग ज्यावर वाहतूक असते तिथे मॉर्निंग वॉक, व्यायाम करणे टाळलेच पाहिजे. कुठले वाहन कुठल्या स्थितीत जातंय, त्याचं लक्ष आहे का हे सांगणं कठीण असल्याने इथे मॉर्निंग वॉक करणे धोकादायक ठरू शकते. शक्यतो गार्डन, मैदान, निर्जन स्थळ पाहूनच व्यायाम, मॉर्निंग वॉक करावा. जेणेकरून असल्या घटना टाळता येतील.


महत्वाच्या बातम्या :