मुंबई : शिवसेना उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. उत्तर प्रदेशात 80 ते 90 , तर गोव्यात 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार आहे, असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. यापूर्वी एनआयए वृत्तसंस्थेनं शिवसेना उत्तर प्रदेश निवडणुकीत 403 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती ट्वीटमार्फत दिली होती. परंतु, संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकींमध्ये शिवसेना 80 ते 90 जागा लढवण्याचा विचार करत असल्याची माहिती दिली आहे. 


संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "गोव्यात आम्ही निवडणूक नक्की लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये देखील 80 ते 90 जागा लढविण्याचा विचार सुरु आहे. तशी आमच्या पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत. या संघटनांनी सांगितलेलं आहे की, तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. इतर काही लहान पक्ष आहेत, त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे. त्याला कितपत यश येतं त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्यांच्यामध्ये सहभागी होऊ शकेल."


एएनआय वृत्तसंस्थेनं ट्वीटकरुन माहिती दिली होती की, "शिवसेनेनंही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. अद्याप या निवडणूकीत शिवसेना युती करणार का? आणि  कोणासोबत युती करणार? हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही."



दरम्यान, उत्तर प्रदेशच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीत शिवसेना नेत्यांनी आरोप लावलाय की, भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. राज्यात बहिणी, मुली कोणीही सुरक्षित नाही. तर जनता बेरोजगारी आणि महागाईनं त्रस्त आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेनं, उत्तर प्रदेशातील शिवसेना कार्यालयाचं प्रसिद्ध पत्रकही ट्वीट केलं आहे. 


गोवा विधानसभा निवडणूकीत 20 जागा लढवणार : संजय राऊत 


गोवा विधानसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये 20 जागा लढवण्याचा शिवसेनेचा विचार सुरु असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. गोव्यामध्येही महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्यासाठी हालचाली सुरु असून येत्या काळात त्यामध्ये अधिक स्पष्टता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 


खासदार संजय राऊत म्हणाले की, "गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा विचार सुरु आहे. त्याला कितपत यश येतं त्यासंदर्भात आताच निश्चित काही सांगता येणार नाही, पण त्या संदर्भात हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगलं स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकेल.".


महत्त्वाच्या इतर बातम्या :