मुंबई : राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे.
आजपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंट (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेट्स, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
एसओपीमध्ये पुढीलप्रमाणे सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत
- प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का? हे तपासावे. उदा. तापमान, सर्दी, खोकला.
- लक्षणविरहीत ग्राहकांनाचं केवळ प्रवेश द्यावा.
- हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी.
- कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.
- ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी. जेणेकरुन कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.
- कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात यावी.
- शक्यतो पैसे हे डिजीटल पद्धतीने स्वीकारावे.
- वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासत राहवे. तिथे सातत्याने स्वच्छता ठेवावी.
- ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा.
- सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
- हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.
- एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.
- दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे.
- वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.
- हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.
मुंबई महापालिकेने हॉटेल मालकांना जारी केलेली नियमावली
दरम्यान हॉटेल्स, रेस्टरंट्स आणि बार सुरु करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेने इतरही काही नियम जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांना राज्य सरकारच्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेच्या नियमांचंही पालन करावं लागणार आहे.
काय आहेत मुंबई महापालिकेचे नियम?
मुंबईतले हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री-बुकींग आवश्यक
ठरावीक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही
दोन टेबलमध्ये 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक
टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं गरजेचं आहे
हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकिय चाचणी आणि कोविड टेस्ट करणंही गरजेचं असेल
50 टक्के क्षमतेने आस्थापाने सुरु होणार
ग्राहकांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो जागेचे पूर्व आरक्षण करावे. आस्थापना चालकांनी सेवा देताना कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतांबाबत तसेच वैयक्तिक स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदीबाबत कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यावे. याशिवाय ग्राहकांनी रेस्टॉरंटमध्ये येण्यापुर्वी आणि आल्यानंतर घ्यावयाच्या दक्षता, अन्न आणि पेयपदार्थ तयार करणे आणि त्याची सेवा देताना घ्यावयाच्या दक्षता, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना द्यावयाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण, ग्राहकांना सेवा देताना घ्यावयाची दक्षता, बारमध्ये घ्यावयाच्या दक्षता, किचनमध्ये घ्यावयाच्या दक्षता, सुक्या आणि ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, स्टाफ एरियासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची वाहतूक, कर्मचाऱ्यांच्या गणवेशासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे, कर्मचाऱ्यांची खानपान सुविधा, एखाद्या कर्मचाऱ्यामध्ये कोरोना लक्षणे आढळल्यास किंवा कोरोनाबाधित आढळल्यास तातडीने करावयाची कार्यवाही अशा विविध मुद्द्यांसंदर्भातील मार्गदर्शक सूचनांचा समावेश एसओपीमध्ये करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर टेबलचं प्री-बुकींग आवश्यक; महापालिकेची नियमावली जारी
राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर