मुंबई : ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. त्यावेळी रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यामुळे देशातील सर्वच व्यवहार आणि उद्योगधंदे ठप्प झाले होते. याचा परिणाम राज्याच्या अर्थचक्रावरही झाला होता. तसेच अनेकांचा हातातलं कामंही गेल्यामुळे बेरोजगारीचं संकटंही उभं ठाकलं आहे. अशातच सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.


सध्या संपूर्ण देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आणि अनलॉकमध्ये काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण झाले आहेत. अशातच अजूनही राज्यात अनेक गोष्टी बंद आहेत. त्यापैकी एक म्हणजे, रेस्टॉरंट्स.


ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यात रेस्टॉरंट्स सुरु करण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधी कार्यपद्धती ठरवण्यात येणार आहे. नेमके रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची परवानगी असेल? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचं काटेकोरपणे पालन करत सरकार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.


दरम्यान, रेस्टॉरंट्स सुरु करण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरील भार कमी होऊ शकतो. तसेच अनेक लोकांच्या हाताला कामंही मिळू शकतं. तसेच रेस्टॉरंट्सच्या मालकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.