रत्नागिरी : कोकणात 11 जून रोजी मान्सून दाखल झाला. पण, निसर्ग चक्रिवादळ कोकण किनारपट्टीला धडकलं आणि त्यानंतर पावसानं कोकणात हजेरी लावली. यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीच्या कामांना देखील वेग आला. अनेकांना पेरणी करत शेतीला सुरूवात केली. त्यानंतर आता हीच पिकं लावणी योग्य झाली आहेत. पण, मागील चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने मात्र गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे आता भातशेतीच्या लावणीवर सध्या परिणाम झालेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सारखीच परिस्थिती दिसून येत आहेत. काही भागांमध्ये पाणथळ जागा असलेल्या ठिकाणी सध्या लावणीचे काम सुरू आहे. पण, अनेक ठिकाणी पाणी उपलब्ध होत नसल्याने बळीराजा देखील आता त्रस्त झाला आहे. काहींनी तर अनेकांनी पावसावर विश्वास दाखवत भात काढून ठेवले. पण, मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे ही रोपे देखील आता सुकू लागली आहेत. जिल्ह्यातील काही ठिकाणी तर पावसाअभावी जमिनिला भेगा पडल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता करायचे तरी काय? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. मागील आठवड्यात सलग चार दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात होते.




यंदा संकटांचा काळ

 

'याची तशी ही नाटकं आता दरवर्षीची झाली आहेत. लावणीला सुरूवात करायची म्हटलं की हा दडी मारतोच' अशा शब्दात सध्या जिल्ह्यातील बळीराजा या वरूणराजावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. कोरोनामुळे यंदा खते देखील उशिराने मिळत आहेत. अनेक शेतकऱ्यांना अद्याप देखील खते मिळालेली नाहीत. दरम्यान, जिल्ह्यात सध्या हजारो टन खतांचा तुटवडा जाणवत आहे. पण, पुढील चार दिवसांत ही समस्या देखील दूर होईल अशी माहिती कृषी विभागाचे अधिकारी देत आहेत. मजूर गावी गेल्याने ट्रेननं आलेली खते वेळेवर उतरवली गेली नाहीत. परिणामी शेतकऱ्यांपर्यंत देखील ती उशिराने पोहोचली अशी माहिती या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.


पंपाच्या साहाय्याने लावणी

सुरूवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नदी, ओहोळ यांच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली. त्यामुळे आता पावसाची वाट न पाहता काहींनी तर चक्क पंपाची मदत घेत भातशेतीच्या लावणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे खर्चामध्ये देखील वाढ होत आहे. पण, नाईलाज आहे. लावणी योग्य झालेली पिकं मरून जातील. यासाठी हे सारे करावे लागत असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या :