औरंगाबाद : सायबर भामट्यांनी लोकांना फसविण्याचे अनेक नवीन फंडे शोधून काढले आहेत. कॉल करून खात्याची डिटेल्स मिळवीत रक्कम हडप करणाऱ्या भामट्यांनी आता फेसबुक अकाउंट हॅक करून अडचणीत असल्याचे भासवून मित्रांकडून 10 ते 15 हजार रुपये उकळण्याचा नवीन फंडा सुरू केला आहे. औरंगाबादेतील एका लघु उद्योजकाचे खाते हॅक करून तब्बल 214 जणांना चॅट करीत पैशांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.


अशोक शेळके हे लघु उद्योजक आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद येथे त्यांचा रबर मोल्डिंग आणि प्लास्टिक मोल्डिंगचा उद्योग आहे. ते मंगळवारी कंपनीत असताना एका मित्राचा कॉल आला. त्यांनी आपुलकीने विचारपूस करीत तुम्हाला काय अडचण आहे?, 15 हजार रुपयांसाठी थेट फेसबुकवर का पोस्ट टाकली?, खरंच अडचणीत आहात काय? अशी विचारपूस सुरू केली. त्यांनतर आणखी एका मित्राचा तसाच कॉल आला. मित्र मलाच का इतक्या काळजीने विचारत आहेत, असा प्रश्न पडल्याने शेळके यांनी आपले फेसबुक खाते उघडले. त्यावरून त्यांच्याच नावाने चॅटिंग सुरू असल्याचे दिसले. तसेच, जवळपास 214 जणांना चॅट करून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचे समजले. त्यांनी तत्काळ कंपनीतील तंत्रिकाला बोलावून हा काय प्रकार आहे? याबाबत विचारले. तेव्हा त्यांनी तुमचे खाते हॅक झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पासवर्ड बदलून त्यावर हा फसवणुकीचा प्रकार आहे. नमूद मोबाईल क्रमांकावर कोणीही पैसे टाकू नयेत, अशी पोस्ट केली. तसेच, बुधवारी पोलिस आयुक्त कार्यालयातील सायबर ठाण्यात तक्रार केली.

हिंदीत चॅटिंगवर संशय घ्या
फेसबुकवर तुम्ही मराठीत चॅट करीत असताना समोरून जर हिंदीत चॅटिंग केली जात असेल किंवा तुम्ही वेगळा विषय चर्चेत आणत असताना तो जर पैसेच मागत असेल तर संशय घ्यावा. त्यावर आर्थिक व्यवहार करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. भामटे सावज शोधत असतात, त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहणे अधिक गरजेचे आहे. कोणीही खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत.

संबंधित बातम्या :