Monsoon Update मुंबई: पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून (Monsoon Update) दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. मान्सून मालदीव, कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मेपर्यंत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं याआधीच दिली आहे.
यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी वर्तवला. रेमल चक्रदीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाने वेगाने वाटचाल केली असून पुढील तीन ते चार दिवसात पाऊस केरळमध्ये दाखल होईल. देशात मान्सूनच्या महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश होता. पावसावर अवलंबून असलेल्या कृषीक्षेत्रामध्ये सरासरीपेक्षा 106 टक्क्यांनी अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जूनपासूनच मुसळधार पाऊस-
जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. जूनमध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाईल. जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होईल. याचा परिणाम म्हणून जून ते जुलै या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबईत 10 ते 12 जूनला पावसाचं आगमन-
महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. 10 ते 12 जूनला मुंबईत पावसाचं आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे.
अवकाळी पावसानं पश्चिम विदर्भाला पुन्हा झोडपलं
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाच्या धारा बरसल्या. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला माल भिजल्यामुळे शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचे नुकसान झालेलं आहे. तर अनेक गावात मोठे झाडे उन्मळून पडली असल्याने विजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी नारिकांना रात्र अंधाऱ्यात काढावी लागली आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे अक्षरशः उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
संबंधित बातमी:
गूड न्यूज! मान्सूनच्या आगमनाची तारीख ठरली, या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून