El Nino Monsoon Update: राज्यात एकीकडे मान्सूनचे (Monsoon) वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्राच्या वेशीवर नैऋत्य मोसमी वारे हजर झाले आहेत. दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रात पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. मात्र, दुसरीकडे प्रशांत महासागरात (Pacific Ocean) एल निनोची चाहूल लागली असून युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फोरकास्ट या संस्थेने प्रशांत महासागरात एलनिनोची स्थिती विकसित होत असल्याचं  सांगितलं. परिणामी, भारताच्या यंदाच्या मान्सून वर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहू शकते. (Maharashtra Weather Update)

Continues below advertisement

प्रशांत महासागरात समुद्राचा तळ तापला

सध्या प्रशांत महासागरात मोठमोठे हवामान विषयक बदल घडत आहेत. या बदलांकडे जगभरातील हवामान तज्ञांचे बारकाईने लक्ष आहे. EWMWF च ताजा माहितीनुसार, प्रशांत महासागरातील समुद्राचा तळ एलनिनो ची सुरुवात दर्शवणाऱ्या महत्त्वाच्या मर्यादेपेक्षा अधिक तापला आहे.  युरोपियन स्पेस एजन्सीने देखील आपल्या प्रगत उपग्रह यंत्रणेच्या सहाय्याने समुद्राच्या पृष्ठावरील तापमानाने वातावरणीय बदल याकडे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. यातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात समुद्राच्या तळाशी तापमान वाढ नोंदवली जात आहे. एलनिनोची चाहूल लागत असल्याने यंदाच्या मान्सूनवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एल निनो म्हणजे नेमकं काय ?

पृथ्वीच्या हवामानावर नियंत्रण ठेवण्यात प्रशांत महासागराची भूमिका महत्त्वाची आहे. सामान्य परिस्थितीत, पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे उष्ण पाण्याला आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दिशेने ढकलतात. त्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावर खोल समुद्रातील थंड आणि पोषक तत्त्वांनी समृद्ध पाणी वर येते. या प्रक्रियेला 'अपवेलिंग' असं म्हटलं जातं. मात्र, अन निनोच्या काळात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे हे वारे (Trade winds ) कमकुवत होतात. किंवा काही वेळा उलट दिशेने वाहू लागतात. परिणामी पश्चिम प्रशांत महासागरातील उष्ण पाणी पुन्हा अमेरिकेच्या दिशेने सरकते. या उष्णतेच्या पुनर्वितरणामुळे जगभरातील पर्जन्यमान आणि तापमानाच्या पद्धतींमध्ये मोठे बदल होऊ शकतात.

Continues below advertisement

भारतीय मान्सूनवर काय परिणाम होऊ शकतो ?

भारतात अल निनोची स्थिती सामान्यतः मान्सूनसाठी अनुकूल मानली जात नाही. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर अलनिनो आणि कमी पावसाचा मान्सून यांचा जवळचा संबंध राहिलेला आहे.त्यामुळे कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रांवर याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सध्या अल निनो अधिकृतपणे जाहीर झालेला नाही.तो जाहीर करण्यासाठी तापमानाशी निगडित ही परिस्थिती किमान तीन महिने कायम राहणे आवश्यक असते.

ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ मटेरियलॉजीच्या आकडेवारीनुसार, प्रशांत महासागरातील 'निनो 3.4 ' या महत्त्वाच्या क्षेत्रातील तापमान 0.5 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक वाढले आहे.अल निनो ओळखण्यासाठी हा आकडा महत्त्वाचा मानला जातोय. 

यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमीच !

दरम्यान यंदा भारतीय हवामान विभागाने केलेल्या मान्सून पूर्व अंदाजानुसार यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या तुलनेत सरासरी पावसापेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा देशात सरासरीच्या तुलनेत सुमारे 90% पाऊस पडू शकतो. 

यंदा मान्सूनने 4 जून रोजी केरळ किनारपट्टी गाठली. सामान्यतः या भागात 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. म्हणजेच यंदा तीन दिवस मान्सून उशिरा पोहोचला आहे. आगामी काळात प्रशांत महासागरातील तापमान वाढ आणि इतर वातावरणीय घटक यांचा परस्पर परिणाम कसा होतो यावर हवामान तज्ञांचे लक्ष राहणार आहे.संभाव्य उष्णतेच्या लाटा आणि पावसातील चढउतार यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा:

 मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज