Monsoon Maharashtra: देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. 4 मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon) आता महाराष्ट्राच्या वेशीवर थांबलाय. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम मध्यावर आहे. 5 जूनला गोवा, कर्नाटकातील काही भाग तसेच तमिळनाडू या राज्यांमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर येत्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सूनचा पहिला पाऊस कोसळणार असल्याचं भारतीय हवामान खात्याने वर्तवलं. नैऋत्य मोसमी वारे पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, थोडक्यात पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात वेगाने आगेकूच करत आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात 5 ते 11 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update)
Monsoon Update: मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर
नैऋत्य मौसमी वारे महाराष्ट्राच्या सीमेवर असून पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी पूर्व मान्सूनची हजेरी लागते आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने आज राज्याच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग व संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे.
दुसरीकडे आज पालघर,ठाणे, मुंबई भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारून ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची ही शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.
Weather Update:कुठे काय इशारा ?
हवामान विभागाने दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलक्या व मध्यम सरी बसणार असून विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
येलो अलर्ट : पालघर ठाणे मुंबई - उष्ण व दमट : नाशिक, पुणे,रायगड ,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली ,सातारा, नगर : संभाजीनगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ ,वर्धा ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
Weather Update: सात दिवसात मुसळधार
पुढील सात दिवसात केरळ आणि कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. सहा आणि सात जून रोजी केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्ये पुढील सात दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. शुक्रवारी गोव्यात मान्सून दाखल झाला. त्यामुळे नैऋत्य मौसमी वाऱ्यांची पुढील वाटचाल पोषक आहे. दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रात लवकरच मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
मुंबईकर उकाड्याने हैराण
आज मुंबई पालघर ठाणे भागात दुपारपर्यंत उष्ण व दमट हवामान राहणार असून संध्याकाळी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना उकडाने हैराण केले आहे.शहरात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून हवेतील आद्रता वाढली आहे.
