Murud Janjira Fort : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध मुरूड येथील जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेले रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे हे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. यामुळे, मुंबई, ठाणे, पुणे आणि आसपासच्या परिसरातील अनेक पर्यटक हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करीत असतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आज 26 मे पासून पावसाळ्याच्या हंगामात जंजिरा किल्ल्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे.
मुंबई, ठाणेच्या जवळच्या परिसरासह इतर ठिकाणांहून पर्यटकांची मोठी गर्दी मुरुड जंजिरा येथे होते. सुट्टीच्या हंगामात पर्यटकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने लाखो पर्यटक हजेरी लावत असतात. तर, रायगडच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेले मुरूड हे पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण असून समुद्राच्या मध्यात असलेला जंजिरा किल्ला पाहण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. मुरूडपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या राजपुरी बंदरातून बोटीतून प्रवास करीत जंजिऱ्याच्या किल्ल्यावर पोहचता येत असल्याने शिडाच्या बोटी या पर्यटकांच्या आणि बच्चेकंपनीचे आकर्षण आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना बंदी करण्यात आली होती. यामुळे, या ठिकाणी असलेल्या स्थानिकांच्या आणि बोट चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. तर, गेल्या पाच महिन्यांपूर्वी डिसेंबर महिन्यात पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली होती. यामुळे, आताच्या उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने पुन्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक येत होते. तर, शालेय विद्यार्थ्यांना असलेली सुट्टी देखील येत्या काही दिवसात संपणार असल्याने अनेक पर्यटक हे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी हजेरी लावत आहेत.
त्यातच , मान्सूनच्या हंगामाला सुरुवात होत असल्याने समुद्री लाटांमध्ये बदल होऊ लागला असल्याने जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ उतरणे कठीण होते. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याने मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागामार्फत जंजिरा किल्ल्यावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे.