Maharashtra Gondia News : लग्न म्हटलं की, हळद, मेहंदी, संगीत, वरात, आणि धम्माल. पण एका तरुणानं समाजापुढे आदर्श ठेवत आपल्या लग्नाची वरात चक्क बैलगाडीतून काढली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 बैलगाड्यांवरुन नवरदेवाची वरात काढण्यात आली. गोंदियातील कडीकसा गावात 25 बैलगाड्यांवरून ही लग्नाची वरात काढण्यात आली. इंधनदरवाढीमुळे आणि परंपरा जोपासण्यासाठी बैलगाडीवरून वरात काढण्याचा निर्णय खुद्द नवरदेवानंच घेतला होता. 


लग्न म्हटलं की, वाहनांची भलीमोठी रांग. कर्णकर्कश आवाजात वाजणारा डीजे आणि दारुच्या नशेत डोलणारी तरूणाई हेच चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र या दिखाव्याचं ढोंग बाजूला सारत देवरी तालुक्यातील कडीकसा येथील देवराज कुंभरे या तरूणानं आपल्या लग्नात वाहन किंवा कर्णकर्कश डीजे न ठेवता तब्बल 25 बैलबंड्यांतून 10 किलोमीटर वरात काढली.




सध्या देशासह राज्यात इंधनाचं दर ज्याप्रमाणे वाढत आहेत. त्या दरवाढीमुळं प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. आजच्या घडीला आधुनिकता आणि फॅशनच्या शर्यतीत प्रत्येकांना लग्न सोहळा करणं तारेवरची कसरत वाटत आहे. अशा परिस्थितीत ही आदिवासी समाजातील तरुण पीढी आदिवासी रितीभातींच्या पलीकडे जाऊन लग्नासारखे विधी करतात. असाच एक लग्न सोहळा देवरी तालुक्यातील कडीकसा येथे पार पडला. 


आदिवासी समाजातील तरुण देवराज कुंभरे यांचा लग्न याच तालुक्यातील वांढरा येथील मनीराम कुंजाम यांची मुलगी टिकाबाली यांच्यासोबत पार पडला. या लग्न सोहळ्यात जाणारी वरात ही कार-बसने नाही तर तब्बल 25 बैलगाड्यांवरून काढण्यात आली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. वर देवराजच्या बैलगाडीपासून ते ज्या बैलगाडीमध्ये वरातीत बसणार होते, त्यालाही आकर्षक देखावा करण्यात आला होता. 


आदिवासी रीती रिवाज आणि संस्कृती प्रमाणे लग्नाच्या वरातीत फक्त आदिवासी लोकगीत सादर करण्यात आलं. तसेच लोप पावत चाललेली कला या लग्नात सादर करण्यासाठी वऱ्हाडी आदिवासी नृत्यावर थिरकले. हा विवाहसोहळा आदर्श ठरला असून आपली लोकपरंपरा जीवंत ठेवण्याकरता हा निर्णय घेतला असल्याचं देवराज कुंभरे या तरूणानं सांगितलं आहे. अशा प्रकारे बैलगाडीवर निघनारी लग्नाची वरातींची मिरवणूक तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच पहायला मिळाली. या अभिनव उपक्रमामुळं तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात देवराज यूथ आयकॉन ठरला आहे. या लग्नाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.