Monsoon News : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. तसेच देशातील काही राज्यात देखील पाऊस पडत आहे. दरम्यान, मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अनुकूल वातावरण तयार झालं आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणासह संपूर्ण पंजाब आणि चंदिगडमधून मान्सून माघारी माघारी परतला आहे. तसेच राजधानी दिल्लीतून देखील मान्सून माघारी फिरला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. तर महाराष्ट्रातून पाच ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान मान्सून माघारी फिरणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
सध्या देशात मान्सून माघारी फिरण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. वायव्य राजस्थान आणि गुजरातमधील कच्छमधून मान्सून आधीच परतला आहे. अशातच, आता जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणासह दिल्लीतूनही मान्सून माघारी फिरला आहे. त्यामुळं आता पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे.
मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. लातूर (Latur), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) आणि हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. कमी कालावधीत झालेल्या या तुफान पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनसह इतरही पिकांचेही खूप मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी सोयाबीन लागवडीपासूनच सतत होणारा पाऊस, शंख गोगलगाय, रोगराई असे संकट सुरु होते. यातून जी पिके वाचली त्यांना या पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जोरदार वारे आणि विजेच्या कटकडाटासह झालेल्या पावसाने जीवितहानी देखील झाली आहे.
फुल उत्पादकांनाही फटका
लातूर जिल्ह्यात वीज पडून एक महिला आणि दोन जनावरे दगावली आहेत. हिंगोलीतील फुल शेती पावसाच्या पाण्यात वाहून गेली आहे. तसेच इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. परभणीत तीन दिवसांपासून पावसाने पाठ सोडली नसल्यामुळं शेतीचं खूप नुकसान झालं आहे. येलदरी आणि लोअर दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं आहे. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसापासून सतत पावसामुळे अनेक शेत शिवारात पाणी जमा झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात वाहून गेली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: