बीडः शेतकऱ्याला जमिनीचा ताबा देण्यासाठी सावकाराने मुलगी आणि सूनेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यात समोर आला आहे. याप्रकरणी योग्य कारवाई करण्याचं आश्वासन बीडचे पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी दिलं आहे.

 

सावकाराने कर्जाच्या बदल्यात जमिन ताब्यात घेतली आहे, अशी तक्रार शेतकऱ्याने एप्रिलमध्ये बीड पोलिसांत केली होती. मात्र त्यावर कसलीही कारवाई झाली नाही. त्यानंतर सावकाराने जमिनीचा ताबा देण्यासाठी शेतकऱ्याला चक्क मुलगी आणि सून आपल्याकडे पाठव, अशी मागणी केली आहे.

 

काय आहे प्रकरण?

धारुर तालुक्यातील शेतकरी इंदर मुंडे यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. कर्ज वेळेत भरु न शकल्यामुळे सावकार भगवान बडे यांनी शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतला. इंदर मुंडे यांनी सावकाराकडे जमिनीची मागणी केली असता भगवान बडे यांनी तुझी मुलगी आणि सून माझ्याकडे पाठव, अशी मागणी केली.

 

मुंडे यांनी केलेल्या तक्रारीची कोणीही दखल न घेतल्यामुळे न्याय मिळण्यासाठी त्यांना थेट उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी याप्रकरणी अहवाल मागितला आहे. तसेच पोलिसांनी देखील योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.