महाराष्ट्रातून नितीन गडकरी, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर आणि पियुष गोयल यांनी मोदी सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळात प्रभावी कामगिरी केली होती. त्यामुळे याहीवेळा ही नावे परत दिसण्याची शक्यता आहे
मंत्रीमंडळ निवडताना महाराष्ट्रातून कोणाची निवड होते? हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मंत्र्यांची निवड करताना काही जातीय समीकरणे लक्षात घेतली जाणार का? याचीदेखील चर्चा सुरु आहे.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात समावेश होता. परंतु अवघ्या दीड वर्षानंतर दानवेंना राज्यात पाठवले गेले. आता दानवेंना पुन्हा दिल्लीमध्ये पाठवले जाणार का? याचीही उत्सुकता आहे.
महाराष्ट्रामधून सुभाष भामरे आणि हंसराज अहिर हे दोन राज्यमंत्री होते. परंतु अहिर यांचा नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे अहिर यांच्या जागेवर कोणत्या नव्या चेहऱ्याची वर्णी लागणार?याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
धनगर समाजाचा मागील काही काळापासून सरकारवर विशेष रोष आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठी यावेळी विकास महात्मे यांचा विचार होणार का? याकडेही लक्ष असेल. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला पाय रोवायचे असतील तर तिथेही ताकद देण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सांगलीला भाजपच्या बालेकिल्ल्यात परावर्तित करणाऱ्या संजयकाका पाटील यांना मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे.
शिवसेनेच्या नेत्यांना संधी मिळणार का?
मोदींच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला स्थान मिळेल का याबाबतही लोकांना कुतूहल आहे. भाजपकडे तीनशेपेक्षा जास्त जागा असल्या तरी एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी मित्रपक्षांना समान वागणूक देण्याची कमिटमेंट दिली होती. त्यामुळे शिवसेनेला किमान दोन आणि कमाल तीन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या दोन मंत्रीपदांपैकी अनिल देसाईंचे मंत्रीपद हे निश्चित मानले जात आहे. अनिल देसाई यांना मागील वेळी विमानतळावरून परत जावे लागले होते. त्यानंतर मोठे मानापमान नाट्य रंगले. त्यामुळेच देसाई यांना यावेळी संधी मिळेल. शिवसेनेच्या दुसऱ्या मंत्रिपदासाठी निलेश राणेंना पराभूत करणाऱ्या विनायक राऊतांच्या नावाची चर्चा आहे. मुंबई महापालिकेचा अनुभव असलेले राहुल शेवाळे, अरविंद सावंत तसेच यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांचीही नावे चर्चेत आहेत.
व्हिडीओ पाहा
आठवलेंचं मंत्रीपद पक्कं?
दरम्यान, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे मंत्रिपद कायम राहणार का हादेखील सर्वांना प्रश्न आहे. आठवलेंना नाकारले तर त्याची जास्त चर्चा होऊ शकते. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर भाजप आठवलेंना डावलण्याची रिस्क घेणार नाही.