MNS : महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मनुष्यहानी झाली आहे. घरांची पडझड झाली आहे. असे अनेक प्रकारचे नुकसान झाले आहे. परंतु यावर शासन शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या फेऱ्यात अडकवून गोलमाल भूमिका घेत कुठलीही ठोस मदत आपत्तीग्रस्ताना करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून ठोस मदत मिळावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे.
उद्या ठीक 11वाजता आपण सर्वांनी ताकतीने शेतकऱ्यांना सोबत घेवून निदर्शने आंदोलन करावयाचे आहे. असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर काही ठइकाणी पूर आले आहेत. पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. अनेकांची घरे पडली आहे. जनावरे वाहून गेली आहेत. सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे. मोठ्या प्रमाणात फटका शेती पिकांना बसला आहे.
मनसेच्या नेमक्या काय आहेत मागण्या?
- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तात्काळ कर्जमाफी करा.
- जिरायती शेती पिकासाठी हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत करावी
- बागायती शेती पिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत करावी.
- फळबाग शेती पिकांसाठी हेक्टर दोन लाख रुपयांची मदत द्या.
- ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत द्या आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्या
- ओल्या दुष्काळात मृत पावलेल्या जनावरांना प्रति जनावर 75 हजार रुपयांची मदत करा
- जमिन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकरी 1 लाख रुपयांची मदत करावी.
- घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजने अंतर्गत घर बांधून द्यावेत.
गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा कहर
अशा मागण्या मनसेच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. लवकरात लवकर राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील बहुतांश भागात पावसाने कहर केल्याचे चित्र आहे. सध्या जरी पावसाचा जोर कमी झाला असला तरी या अतिवृष्टीच्या नुकसानीची दाहकता आता समोर येत आहे. बीड मधील आष्टी, शिरूर कासार, परळी, अंबाजोगाई तालुक्यासह अन्य तालुक्यात मागील काही दिवसात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह जिवीत आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासह अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. याच सर्व नुकसानीचा आढावा मंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत प्रशासनाकडून घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Weather Update : विदर्भ-मराठवाड्याला अतिवृष्टीचा फटका, बळीराज्याच्या तोंडाचा घास हिरावला; मंत्री पंकजा मुंडे आज घेणार बीडच्या नुकसानीचा आढावा