औरंगाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन शिवसेनेनं हिंदुत्त्वाशी तडजोड केल्याचा आरोप होत असताना, हातात भगवा धरणाऱ्या मनसेकडून ती पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतराचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे पुढे सरसावली आहे. नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेच्या तयारीसाठी कृष्णकुंजवर मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी 12 मार्चला राज ठाकरे स्वतः औरंगाबादला जाणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तारखेनुसार शिवजंयती साजरी केली. त्यामुळं शिवसेनेला शह देण्यासाठी मनसेनं ही खेळी खेळल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

औरंगाबाद शहराचं नाव आणि इतिहास; 'संभाजीनगर'ची मागणी कुठून आली?


आज मनसे नेत्यांची महत्वाची बैठक झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर, राजू पाटील, अमेय खोपकर, अभिजित पानसे, अविनाश जाधव यांच्यासह इतर मनसे पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटायला कृष्णकुंजवर आले होते. यावेळी औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणूक तयारीला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे नेते, पदाधिकारी यांना दिले.

औरंगाबादचं नाव लवकरच संभाजीनगर होणार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा दावा


यावेळी एबीपी माझाशी बोलताना मनसे नेते अभिजित पानसे यांनी सांगितलं की, 12 मार्चला औरंगाबादमध्ये तिथीनुसार शिवजयंती होणार आहे. त्यासाठी राज ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. या औरंगाबादकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही. त्यामुळे कुणालातरी लक्ष द्यावे लागेल. मनसे या शहराचा कायापालट करणार आहे, असं पानसे म्हणाले. औरंगाबादला संभाजीनगर असं नाव द्यायला कुणा धर्मियांचा विरोध का असावा? संभाजीनगर हे नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असंही ते म्हणाले.

मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी?


दरम्यान, औरंगाबाद, नवी मुंबई महापालिका निवडणूक रणनीतीसाठी मुंबईतील नेते आणि पदाधिकाऱ्यांची टीम तिथं जाणार असल्याची माहिती आहे.