पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पोलीस उपनिरीक्षकपदाच्या 650 जागांसाठी निघालेल्या एका नव्या जाहिरातीमुळे वाद निर्माण झाला आहे. यामध्ये आरक्षणानुसार जागावाटप झाला नसल्याचा आरोप एमपीएससीची तयारी करणाऱ्या धनगर आणि वंजारी समाजाच्या  विद्यार्थ्यांनी केला आहे. हा प्रश्न धनगर आणि वंजारी समाजाशी निगडीत आहे. धनगर समाज हा एनटीसी तर वंजारी समाज हा एनटीडी प्रवर्गात मोडतो.

एमपीएससीची पीएसआय, एसटीआय, एएसओ पदांसाठी काल (28 फेब्रुवारी) जाहिरात निघाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण 806 रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 650 जागा आहेत. परंतु या पदांमध्ये आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाला 24 जागा मिळणं अपेक्षित असताना फक्त दोन जागा मिळाल्या आहेत, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. तर वंजारी समाजासाठी एकही जागा निघाली नाही, असं या मुलांनी सांगितलं. आयोगाने नेमक्या कोणत्या निकषावर या जागा काढल्या, अशी विचारणा विद्यार्थ्यांनी केली आहे. जातींना ठरलेल्या आरक्षणाप्रमाणे एमपीएससीने जागा काढाव्यात अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली आहे.

धनगर, वंजारी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप
650 जागांपैकी 475 जागा विविध प्रवर्गांसाठी आरक्षित केलेल्या आहेत. शासन निर्णयाप्रमाणे यापैकी दोन टक्के जागा एनटी - ड (भज - ड) प्रवर्गासाठी आरक्षित असणं अपेक्षित होतं. परंतु या प्रवर्गासाठी जाहिरातीत एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे एनटी - क (धनगर) प्रवर्गासाठी आरक्षित जागांपैकी 3.5 टक्के जागा आरक्षित असायला हव्या होत्या, परंतु या प्रवर्गासाठी केवळ दोन जागा देण्यात आल्या आहेत.

धनजंय मुंडे गृहमंत्र्यांची भेट घेणार!
दरम्यान एनटी- ड व एनटी - क प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर व्हावायासाठी येत्या दोन दिवसात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत तातडीची बैठक घेणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दोन्ही प्रवर्गासाठी शासन निर्णयाप्रमाणे जागा आरक्षित करुन सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, अशी विनंती गृहमंत्र्यांना करणार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.




MPSC परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज नोंदणीची तारीख - 28 फेब्रुवारी 2020
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख - 19 मार्च 2020
प्रीलिम्स परीक्षेची तारीख - 3 मार्च 2020

कोणत्या पदांसाठी किती जागा?
पोलीस उपनिरीक्षक (PSI)- 650 पद
सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) - 67 पद
राज्य कर निरीक्षक (STI)- 89 पद

MPSC शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील विद्यार्थ्याकडे पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.

शारीरिक पात्रता
पुरुष
•उंची – 165 सेंमी
•छाती – 79 सेंमी

महिला
उंची – 157 सेंमी

वयोमर्यादा:
•पीएसआय - 19 ते 31 वर्ष
•एएसओ आणि एसआयटी – 18 ते  38 वर्ष

निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड ही चाचणी आणि मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर केली जाईल.

अर्ज कसा दाखल करायचा?
पात्र उमेदवार महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वर www.mahampsc.mahaonline.gov.in 19 मार्च 2020 पर्यंत यासाठी अर्ज करु शकतात.