मुंबई : राज्यव्यापी अधिवेशनात हिंदुत्त्वाचा पुरस्कार करत मनसे भगवीमय केल्यानंतर, राज ठाकरेंनी त्यांचा मोर्चा पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या घुसखोरांविरोधात वळवला आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याला विरोध करणाऱ्यांविरोधात मनसे 9 फेब्रुवारीला विराट मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. तसेच सीएए विरोधातील मोर्चांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चातून उत्तर देईल, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. मात्र, एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांचा नामोल्लेख करत देशप्रेमी मुस्लिम आपलेच असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. दरम्यान आपल्या भाषणात मनसेनं भगवा झेंडा का निवडला यावर भाष्य करायला राज ठाकरे विसरले नाहीत. शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेला झेंडा योग्य प्रकारे हाताळण्याचं आणि हिंदुत्त्व स्वीकारताना मराठी भाषेचा मुद्दा सोडला नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.


पाहा व्हिडीओ : मराठी आणि हिंदू धर्माला धक्का लावाल तर अंगावर जाईन : राज ठाकरे



पाकिस्तान, बांगलादेशातून अनधिकृतपणे देशात घुसखोरी करणाऱ्यांचे काय, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. भविष्यात युद्ध झाल्यास आपल्या सैन्याला देशातच लढावे लागेल. देशातल्या शत्रूंपासून आपल्याला सर्वाधिक धोका आहे. त्यामुळे घुसखोर बांगलादेशींना देशातून हाकलून द्यावे, असे राज ठाकरे मुंबईतल्या गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात बोलताना म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली. पण जेव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली, तेव्हा त्यांचे अभिनंदन करणाराही मीच होतो. कलम 370 असो किंवा राममंदिराचा विषय, त्यांचे अभिनंदन करणारा मीच होतो. कारण मी माणूसघाणा नाही, यासाठी माझा मोदी सरकारला पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी भूमिका राज ठाकरेंनी अधिवेशनातील भाषणात मांडली.


पाहा व्हिडीओ : नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरेंची एबीपी माझाला सुपर एक्सक्ल्युझिव्ह प्रतिक्रीया



देशात घुसखोरी करणाऱ्यांवर निशाणा साधत राज ठाकरे म्हणाले की, आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करतात. अशी माहितीही माझ्याकडे आहे आणि या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असे राज यांनी सांगितले. झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज बदलला असा होत नाही, असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांनी टोला लगावला आहे.


पाहा व्हिडीओ : आदित्यापाठोपाठ अमित ठाकरेचीही सक्रिय राजकारणात एन्ट्री



दरम्यान, राज यांनी लगावलेल्या टोल्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, प्राण गेला तरी चालेल तरीही मी तुमच्याशी आणि माझ्या जनतेशी खोटं बोलणार नाही म्हणूनच हा एक वेगळा मार्ग मी स्वीकारला. इतकी वर्षे आपण ज्यांच्यावर टीका करत होतो, जे आपले विरोधक होते त्यांचा हात हाती घेऊन मी सरकार स्थापन केलं. उघडपणाने केलं. चोरुनमारुन केलं नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की हा भगवा आम्ही खाली ठेवला. ना आमचा रंग आम्ही बदला ना अंतरंग. आमचा अंतरंग भगवाच आहे आणि आमचा रंगही भगवाच आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं.


संबंधित बातम्या : 


तुमचा धर्म तुमच्या घरात आचरणात आणा, मशिदींवरचे भोंगे कशाला हवेत?, राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा सूर


मी रंग बदलून सरकारमध्ये जाणारा नाही, नाव न घेता राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला


आम्ही भगवा खाली ठेवलेला नाही, आमचं अंतरंग भगवंच : उद्धव ठाकरे


परप्रांतियांच्या विरोधातली भूमिका सोडली तरच मनसेला सोबत घेण्यासंदर्भात विचार : चंद्रकांत पाटील