Sandeep Deshpande on Raj Thackeray-Eknath Shinde Alliance: मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) घडणाऱ्या नाट्यमयी घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज अनेक चर्चा पाहायला मिळतात. शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडानंतर आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा वारंवार कानावर येत होत्या. पण सध्या राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच आता याबाबात मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील, तसेच ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. अशातच आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, असं म्हणत संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, "मुळात विषय असा आहे की, आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाही कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्मानिय राज ठाकरे घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल, तर त्यात वावगं नाही.
राज ठाकरे मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील : संदीप देशपांडे
"राज कारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. 2024 च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल.", असं संदीप देशपांडे म्हणाले.
बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरेंकडेच : संदीप देशपांडे
संदीप देशपांडे म्हणाले की, "राज ठाकरेंकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे, वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा वारसा आहे, तो राज ठाकरेंकडेच आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबाबतची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबाबतची कास कोणाकडे असेल तर ती राज ठाकरेंकडेच. त्यांचे विचारही सर्व जनतेला आपलेसे वाटतात. कोणतंही राजकारण करताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हे धोरण असलं पाहिजे."
प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आम्हाला कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही : संदीप देशपांडे
अयोध्येद रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी राज ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याचं बोललं जात होतं. पण स्वतः राज ठाकरेंनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही. प्रभू रामचंद्राच्या मनात आलं की, ते भक्तांनी दर्शनासाठी बोलावून घेतात. आम्हाला त्यांच्या दर्शनासाठी तिसऱ्या व्यक्तीच्या निमंत्रणाची गरज नाही. प्रभू रामचंद्रानं निमंत्रण दिलं की, आम्ही जाऊ."
"राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबत बोलताना देशपांडे म्हणाले की, "महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्रातील दोन मोठे नेते, एकमेकांना भेटत असतील, तर त्यात वावगं काहीच नाही. आता लोकसभा, विधनसभा निवडणुका आहेत, त्याबाबत चर्चा झाली असेल, तर त्यात काहीच चुकीचं काहीच नाही.", असं देशपांडे म्हणाले आहेत.
पुण्यात मनसेकडून लोकसभेसाठी तिकीट कोणाला मिळणार अशी सध्या चर्चा आहे. आधी वसंत मोरे इच्छुक असल्याचं बोललं जात होतं, मात्र आता साईनाथ बाबर यांनीसुद्धा पक्षनेतृत्त्वाकडे गळ घातल्याचं बोललं जात आहे. याबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "इथे निर्णय राज ठाकरेच घेतात, इच्छा कोणीही व्यक्त करतात, उद्या मला सांगितलं तर मीसुद्धा निवडणूक लढवीन."
पाहा व्हिडीओ : Sandeep Deshpande Full PC : Raj Thackeray - Eknath Shinde युती करणार? देशपांडे म्हणाले...