Yoga as Sports: राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व क्रीडा प्रकारांमध्ये योगासनाचा समावेश करण्यात यावा. केंद्राप्रमाणे राज्य शासनाने ही क्रीडा प्रकारात योगासनाचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी आज विधान परिषदेत केली. या मागणीवर उत्तर देताना याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत चर्चेत सहभागी होताना योगासनाचा समावेश शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांमध्ये करण्याची मागणी केली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, शिक्षण क्षेत्र, नोकरी, पुरस्कार, किंवा राज्यशासनाच्या बाबतीत हे सगळे लाभ योगासन खेळाडूंना मिळाले पाहिजे. योगासन या क्रीडा प्रकाराचा 2020 मध्ये केंद्र सरकारने राष्ट्रीय खेळांमध्ये समावेश केला गेला आहे. सन 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला १४० पदक मिळाले. त्यामध्ये 16 पदके हे योगासनांमध्ये मिळाले, त्यामुळे सरकारने या पुरस्कारांमध्ये योगासनाचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली.
सत्यजित तांबे यांच्या मागणीला उत्तर देताना क्रीडा मंत्री संजय बनसोडे म्हणाले की, याबाबत तपासू आणि निर्णय घेऊ. मात्र, योगासनाचा अंतर्भाव करायलाच पाहिजे असा वरुन निर्णय आहे. त्यामुळे तपासण्याची गरज नाही, योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याचा निर्णय घ्या, असे निर्देश उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिठासनावरुन दिले. केंद्राने योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे तर राज्य सरकार देखील योगासनाचा क्रीडा प्रकारात समावेश करेल व लवकरच याचा निर्णय घेतला जाईल, असे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने क्रीडा मंत्रालयातर्फे योगासन हा क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिलेली आहे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये योगासनांचा सामावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत सर्वाधिक पदके महाराष्ट्राने मिळवली. योगासनांचा शालेय आणि विद्यापीठांच्याही अभ्यासक्रमात सामाविष्ट करण्यात आला आहे. परंतु अद्याप महाराष्ट्र शासनाने योगासनाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे योगासन या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना नोकरी, शैक्षणिक आणि क्रीडा पुरस्कार अशा प्रकारच्या लाभांपासून वंचित रहावे लागत आहे.
याबाबत विधान परिषदेच्या सभापतींनी योगासनाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याचे स्पष्ट निर्देश पिठासनावरुन दिले आहेत. त्यावर आपण तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. योगासनांचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून योगासन या क्रीडा प्रकारातील खेळाडूंना शासनाच्या पुरस्कार, नोकर भरती मधील आरक्षण, शैक्षणिक आणि इतर सवलती प्राप्त होतील, अशी मागणी करणारे पत्र आ. सत्यजीत तांबे यांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांना दिले आहे.