Sambhaji Bhide in Aurangabad : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या कार्यक्रमाचे आज औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर येथे आयोजित करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या या कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींकडून विरोध झाल्यावर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र अखेर संभाजी भिडे हे या कार्यक्रमासाठी दाखल झाले असून, त्यांचे नियोजित कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आंबेडकर अनुयायींनी मोठी गर्दी केली असून, पोलिसांकडून त्यांना अडवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या गंगापूर परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
संभाजी भिडे यांच्या आजच्या गंगापूर दौऱ्याला आणि कार्यक्रमाला आंबेडकर अनुयायींनी विरोध केला होता. तसेच गंगापूर येथे होणाऱ्या संभाजीराव भिडे यांच्या कार्यक्रमाला परवनगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. याबाबत आंबेडकर अनुयायी यांच्या वतीने पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. मात्र त्यानंतर देखील भिडे हे नियोजित कार्यक्रमासाठी गंगापूर येथे दाखल झाले आहेत. तर भिडे यांना विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आणि आंबेडकर अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, आंदोलकांना कार्यक्रमास्थळी जाण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
गेल्या दोन दिवसांपासून संभाजी भिडे यांच्या औरंगाबाद दौऱ्याची जोरदार चर्चा आहे. कारण त्यांच्या याच दौऱ्याला मोठा विरोध होतांना पाहायला मिळत आहे. भिडे यांच्या गंगापूर शहरातील कार्यक्रमाला परवानगी दिल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे भिडे यांचा कार्यक्रम होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र मोठ्या पोलीस बंदोबस्तात अखेर कार्यक्रम पार पडत आहे. तर भिडे यांना होणारा विरोध लक्षात घेत कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून, छावणीचे स्वरूप आले आहे. तर भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना अडवण्यात आले असून, या ठिकाणी देखील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर आंदोलकांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच पोलिसांकडून त्यांना अडवण्यासाठी जोरदार प्रयत्न होत असतांना पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: