सोलापूर : सोलापूर मध्य विभानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोरोनाची लागण झाली होती. कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती, मात्र लॉकडाऊनच्या काळात लोकांच्या संपर्कात जास्त आल्याने चाचणी केली. त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मात्र योग्य उपचार घेतल्याने कोरोनातुन मुक्त झाल्याचं आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं. कोरोनातुन मुक्त झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे ह्या पुन्हा विकास कामांसाठी रुजु झाल्या आहेत. आज लक्ष्मी विष्णु मिल चाळ परिसरात त्यांनी विविध विकास कामांचा शुभारंभ देखील केला. यावेळी लोकांनी कोरोनापासून घाबरुन जाता, घरात न थांबता हॉस्पीटलशी संपर्क करुन उपचार घेण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले.


मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून सक्तीने वसुली होत असल्याची तक्रार काही ठिकाणी प्राप्त झाली आहे. जानेवारीपर्यंत सक्तीने वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी शासनाकडे तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. सोबतच लॉकडाऊनच्या काळात अनेकांना भरमसाट वीजेची बिलं आल्याची देखील तक्रारी आहेत. या विज बिलांमध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी उर्जामंत्र्याकडे केल्याची माहिती देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.


....याच्यापेक्षा जास्त महत्वाचे विषय देशात : प्रणिती शिंदे


अभिनेत्री कंगना रनौत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरली तसेच सोनिया सेना असे देखील म्हटलं या विषयावर आमदार प्रणिती शिंदे यांनी बोलणं टाळलं. सोलापुरात आणि देशात या पेक्षा जास्त महत्वाचे विषय आहेत. गोरगरिबांचे अनेक प्रश्न आहेत. मला हा विषय महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे या विषयावर बोलणे किंवा टिपण्णी करणे मला उचित वाटत नाही,अशी प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. मात्र विकास कामाच्या कार्यक्रमात केंद्र सरकारवर आमदार प्रणिती शिंदे यांनी निशाणा साधला. देशात अनेक युवक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सरकारने तयारी करायला हवी होती. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्या समोर येत आहेत. सोलापुरात देखील ऑक्सिजनचा मोठा तुटवडा असून केंद्र सरकारने याबाबत पुर्व तयारी करणे महत्वाचे होते, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.


महाराष्ट्र शासनामुळे सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात चांगले काम सुरु असल्याचं देखील आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. सांगली, कोल्हापूर, सातारा यांच्या तुलनेत सोलापूर महानगरपालिका चांगले काम करत आहे. मात्र केंद्र सरकारकडून पाहिजे तेवढी मदत मिळत नाहीये. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, टोसिलीजुमॅब आदी गोष्टी आपल्याला मिळत नाहीयेत, असा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. तसेच केंद्र सरकारने लोकांच्या मनात कोरोनाची भिती निर्माण केली आहे. ती आता काढायला हवी, असे वक्तव्य आमदार प्रणिती शिंदे यांनी विकास कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात केलं.