मुंबई : भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या कमेंटमुळे सध्या सोशल मीडियावर मोठा वाद उद्भवला आहे. एका पोस्टवरती कमेंट करताना वाघ यांनी मराठी कलाकारांची खिल्ली उडवली आहे. हे अत्यंत लज्जास्पद असून सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध होऊ लागला आहे.


मराठी कलाकार कंगनाला नावं ठेवू लागली आहेत. पण कंगनाची मिळकत आणि मराठी कलाकारांची मिळकत यातला फरक लक्षात आणून देणारी पोस्ट ट्विटरवर झाली. त्यावर प्रवक्ते अवधूत वाघ यांनी कमेंट करताना स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात अशी कमेंट मराठी कलाकारांना उद्देशून केली आहे. यावर सोशल मीडियावर वाकयुद्ध उफाळले आहे.


या त्यांच्या कमेटंचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल झाले आहेत. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी या कमेंटचा निषेध केला आहे. ते म्हणातात, मराठी कलाकारांबद्दल असे वक्तव्य करणारे हे भाजप अधिकृत प्रवक्ते आहेत! अतिशय निंदनीय बाब आहे! मतांच्या लालसेपायी हे किती महाराष्ट्रद्रोही होणार ? मराठी कलाकारांवर इतका राग का तर त्यांनी मुंबईवर अभिमान व प्रेम व्यक्त केले..हे भाजपला का झोंबले ?





या पोस्टनंतर कंगनाच्या समर्थनार्थ असलेल्यांनी आघाडी सरकारचा निषेध केला आहे. तर आघाडी सरकारच्या समर्थकांनी मराठी कलाकारांना लावलेल्या या बोलाचा निषेध केला आहे. शिवाय वेगवेगळ्या पोस्टवर आलेल्या कमेंट्समध्ये आता मराठी कलाकारांच्या मानधनाची चर्चा रंगू लागली आहे हे अधिकच लज्जास्पद.


यावर बोलताना मुंबईतला विश्वेश कदम म्हणाला, आघाडी सरकारचं काय चुकलं.. त्यांनी काय करायला हवं होतं.. हे बोलायला हरकत नाही. पण मराठी कलाकारांच्या मानधनाचा मुद्दा काढणं अत्यंत चूक आहे. त्यावर भाजपच्या प्रवक्त्यांनी व्यक्त होणं हे निंदनीय आहे. एक प्रकारचा मराठी इंडस्ट्रीचा तो अपमान आहे.


मराठी कलाकारांना अत्यंत हीन शब्दात ट्रोल करण्यातही यात धन्यता मानण्यात आला आहे. यात ट्रोलर्सनी मराठी कलाकारांना अपशब्द वापरण्याकडेही पुढं मागं पाहिलेलं नाही. या सगळ्या कमेंट्समध्ये कोणत्याही मराठी कलाकाराचं नाव अद्याप प्रकर्षाने पुढे आलेलं नाही. मात्र हे मराठी कलाकार.. असं म्हणून कलाकारांच्या नावानं शिमगा करण्यात आला आहे.