सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून कोकणात राजकारण चागलच तापलेलं आहे. सताधाऱ्यांकडून गेली अनेक वर्षे चिपी विमानतळावरून विमान उडाण सुरू करण्याबाबत अनेक तारखा दिल्या गेल्या. आता याच तारखावरून पुन्हा राजकारण जोरात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले होते. त्यानंतर काल (मंगळवारी) नारायण राणे यांनी 9 ऑक्टोबर ही तारीख अधिकृत असल्याची घोषणा केली. 


यावेळी नारायण राणे यांनी उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही असं म्हणून नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचलं. त्यावर विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या MIDC चा आहे त्यामुळे उद्घाटनाला कोणाला बोलवायचं हे आम्ही ठरवू. राणे पिता पुत्राने शिकवू नये. यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिकिया दिली आहे. आमच्या जोकर खासदार विदुषकाने आधी हे सांगावं की 7 ऑक्टोबरची 9 ऑक्टोबर तारीख कशी झाली. तसंच राजशिष्टाचार विनायक राऊतांनी शिकवू नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमच्याबरोबर यायचं असेल तर त्यांना सुखरूप सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्याचं आणि उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून परत पाठवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ त्यांची चिंता विनायक राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करू नये. केंद्राच्या परवानगी नंतरच विमानतळ सुरू होतं. नुसता खोका उभा करायचा आहे का? नारायण राणे केंद्रीय मंत्री झाले तेव्हा हा प्रकल्प पाठपुरावा करून सुरू होतोय. या अज्ञानी माणसाने थोडा अभ्यास करून बोलावं, अशी टीका केलीय.


Chipi Airport : अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त चिपी विमानतळ; काय आहेत वैशिष्ट्य?


यापूर्वी नारायण राणेंनी प्रयत्न का नाही केले? : राऊत 
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होईल. मुख्यमंत्र्यांना कोण काही बोललं तर मागच्या वेळी काय परिस्थिती झाली ती पहावी. चिपी विमानतळाला अनेकवेळा परवानगी नाकारण्यात आली. त्यावेळी नारायण राणेंनी प्रयत्न का? केले नाहीत, असा सवाल खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.


अद्ययावत सोयीसुविधांनीयुक्त चिपी विमानतळ
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणं आणि पर्यटनाचा विकास करणं या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. 274 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लँडिंगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.