सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं काम पूर्ण झालं आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक वाढवणं आणि पर्यटनाचा विकास करणं या दृष्टिकोनातून हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. 274 हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. विमानतळाची धावपट्टी 60 मीटर रुंद आणि 2.5 किलोमीटर लांबीची आहे. सध्या या ठिकाणी तीन विमान पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे. दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता 15 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. त्याशिवाय या ठिकाणी नाईट लॅंडिगचीही व्यवस्था आहे. विमानात इंधन भरण्याचीही सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.


10 हजार चौरस मीटरचे टर्मिनल काम असून सुमारे 180 प्रवासी क्षमतेची विमानं या ठिकाणी उतरू शकतात. त्याशिवाय एटीसी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) टॉवरचे कामही पूर्ण झालं आहे. हा टॉवर विमानांना उतरण्यास आणि उड्डाणास मदत करतो. विमानांना दिशा कळवण्याचे कामही टॉवर करतो. कुडाळ, कसाल आणि सातार्डा अशा तीन ठिकाणी या विमानतळाला राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. 


सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. हवाईमार्गे येणारे पर्यटक हे गोवा राज्याकडे जातात. पण चिपीचं विमानतळ सुरु झाल्यानंतर थेट दिल्लीसारख्या महानगरातून जिल्ह्यात येणं पर्यटकांना सोपं जाणार आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि मासळीचेही मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. सध्या देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सिंधुदुर्गच्या देवगड हापूस आंब्यानं मोठं नाव कमावलं आहे. आंबा देशाच्या इतर भागांत आणि परदेशात निर्यात होऊ शकतो. विमानतळामुळे चिपी परिसरात कार्गो हब निर्माण होईल. त्यामुळे आंबा देशातल्या आणि विदेशातील बाजारपेठेत थेट पाठवणं सिंधुदुर्गातील व्यापाऱ्यांना शक्‍य होईल. त्यामुळे आंब्याचा ताजेपणा आणि विशिष्ट चव राखणंही शक्‍य होणार आहे. एकूणच आंबा बागायतदारांच्या उत्पन्नात यामुळे वाढ होईल. मत्स्य खवय्यांची संख्या वाढत आहे. हवाई वाहतुकीच्या माध्यमातून ताजी मासळी देशाच्या अंतर्गत भागात पोचवणं शक्‍य होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाला चांगला फायदा होणार आहे. रोजगारवाढीची संधीही उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय विमान वाहतूकीमुळे अनेक खासगी आस्थापना सिंधुदुर्गाकडे वळतील. त्यातून औद्योगिक गुंतवणुकीस चालना मिळेल.आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होणार पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत होत असलेल्या या प्रकल्पाचे काम आय.आर.बी. कडे सोपवण्यात आले आहे. या विमानतळाचे काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. हे विमानतळ फोस सी प्रकारातील आहे. भविष्यातील लागणाऱ्या सर्व सोयींचा विचार करुन या विमानतळाची उभारणी केली आहे.


जिल्ह्यातील राजकीय पक्षांनी आतापर्यंत अनेक तारखा या चिपी विमानतळ उड्डाणाबाबत दिल्या आहेत. मात्र चिपी विमानतळाला अध्याप मुहूर्त सापडलेला नाही. मात्र यावरून जिल्ह्यात राजकारण जोरात सुरु आहे. प्रत्यक्षात सिंधुदुर्गवासीयांना या विमानतळावरून केव्हा विमान प्रवास करता येईल, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.