Anil Parab Majha Katta:  शिवसेना आमदार अपात्रता याचिका निकालात (Shiv Sena MLA Disqualification) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष असल्याचा निकाल देत भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती वैध ठरवली. शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षाची 2018 मधील नवीन घटना सादर केली नसल्याच्या मुद्यावर नार्वेकर यांनी हा निकाल दिला. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अॅड. अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांचा दावा खोटा असल्याचे सांगत निवडणूक आयोगात कोणती कागदपत्रे दिली, याचे पुरावेच सादर केले. अनिल परब यांनी 'माझा कट्टा'वर हे पुरावे सादर करत नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या केली असल्याचे आरोप केला. 


शिवसेना आमदार अपात्रता याचिकेवर बुधवारी, 10 जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल सुनावला. आपल्या निकालात राहुल नार्वेकर यांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल दिला. या निकालात नार्वेकर यांनी शिवसेना पक्षातील 2018 मधील पक्ष घटनेतील दुरुस्तीबाबत आपल्याला माहिती मिळाली नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर 1999 ची पक्ष घटना आहे.  त्या आधारे एकनाथ शिंदे यांचा पक्षावरील दावा मान्य करत असल्याचे म्हटले होते. 


'माझा कट्टा'वर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर नाराजी व्यक्त केली. अनिल परब .यांनी म्हटले की,  पक्ष घटनेतील दुरुस्तीबाबत निवडणूक आयोगाला माहिती देण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडे नवीन घटनाही सादर करण्यात आली. यावेळी अनिल परब यांनी  'माझा कट्ट्या'वर निवडणूक आयोगाला सादर केलेली कागदपत्रे दाखवली. 


सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन 


अनिल परब यांनी म्हटले की, सत्ता संघर्ष प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एक चौकट आखून दिली होती. त्यातच विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यायचा होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी ही चौकट मोडून निकाल दिला असल्याचा आरोप परब यांनी केला. सुप्रीम कोर्टाने चौकट आखून दिल्याने आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, नार्वेकरांनी लोकशाहीची हत्या केली असल्याचे परब यांनी म्हटले.


सुप्रीम कोर्ट, जनतेच्या कोर्टाकडून अपेक्षा


विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचे परब यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून आणि जनतेकडून आम्हाला कौल मिळेल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



आणखी वाचा :


Majha Katta : यामध्ये शिंदेंची काहीच भूमिका नाही, हे सगळं भाजपचं काम, माझा कट्ट्यावर अनिल परबांचा थेट वार  


Majha Katta : भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही, तो मान्यही करणार नाही,  अनिल परब यांनी स्पष्टचं सांगितलं