मुंबई : राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेल्या निकालानंतर भरत गोगावलेंच (Bharat Gogawale) व्हीप हा अधिकृत असून तोच लागू होणार असल्याचं मान्य केलं. यावर अनिल परब (Anil Parab) यांनी माझा कट्ट्यावर (Majha Katta) म्हटलं की, आम्हाला भरत गोगावले यांचा व्हीप लागू होणार नाही आणि आम्ही तो मान्यही करणार नाही.आम्हाला निवडणूक आयोगाने (Election Comission) मान्यता दिलीये, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपात्र केलेलं नाही. 10 व्या सूचीनुसार फूट ही ग्राह्य धरली जाणार नाही. त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन आम्हाला विचारायचं आहे, की सुप्रीम कोर्ट म्हणतंय की फूट पडू शकत नाही, निवडणूक आयोग म्हणत फूट पडली हे मान्य. ज्यावेळी त्यांनी बंड केलं तेव्हाच त्यांना सांगितलं की तुम्हाला अभय दिलंय. जर आमचा व्हीप मान्य नाही तर आम्हाला पात्र का केलंत, असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केलाय. 


जसे ते कायदेशीर सल्ला घेतात तसाच आम्हीही तो सल्ला घेतो. ज्यावेळी दोन निकालांमध्ये तफावत दिसते, त्यावेळी प्रश्न निर्माण होतो की नक्की कोण मोठं. जर सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना मान्यता दिली, तर आम्ही नवीन पक्ष रजिस्टर करु. गोगावले यांचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही. हा जो काही निकाल होता, तो स्क्रिप्टेड होता. जर एका कलामाखाली पात्र करता येतं, तर अपात्र कसं करता येत नाही. त्यांनी फक्त व्हीपबाबत भाष्य केलं. त्यामुळे आता आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं.  


आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय


आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय, त्याचाच त्यांना त्रास होतोय. त्यामुळे या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल. यातल्या कित्येक लोकांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही, ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय. जर या लोकांना काही अडचण होती, तर मविआचं सरकार स्थापन करतानाच त्यांनी सांगायला हवं होतं की, आम्हाला मंत्रीपद नको, आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही. आम्ही पण यातून गेलो होतो, काय दवाब टाकला जातो हे आम्हालाही माहित आहे, असं म्हणत अनिल परब यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.  


शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही


शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे आज जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असं अनिल परब यांनी म्हटलं. 


भाजपने दिलेला शब्द पाळला नाही


भाजपने आम्हाला दिलेला शब्द पाळला नाही. भाजपने ते करायला हवं होतं. त्यावेळेला तुम्ही सगळी पदं उपभोगलीत. जेव्हा त्यांना ईडीची भीती दाखवली गेली, तेव्हा ते सगळे बाहेर गेले. आतापर्यंत पक्षावर दावा कधी कोणा केला नव्हता, जे आता झालंय. राष्ट्रवादी शरद पवारांची नाही, असं महाराष्ट्र का मान्य करेलं. इथे बाळासाहेब नाहीत म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला, तिथे तर शरद पवार आहेत, तरीही हा प्रश्न निर्माण होतो. त्यांचा आरोप होता, अजित पवार असं करतात, तसं करतात. आज अजित पवारांच्याच हाताखाली काम करतायत. शेवटी प्रत्येकजण सत्तेच्या छत्रीखाली गेलाय. ज्यांच्या हातात छत्री आहे, ते फक्त मज्जा बघतंय. त्यामुळे सध्या भाजप फूट पाडून सगळी मज्जा बघतोय, अशी टीका अनिल परब यांनी भाजपवर केली. 


उद्धव ठाकरे यांनी भावनिक होऊन राजीनामा दिला


उद्धव ठाकरे हे भावनिक आहेत, त्यांना राजकीय खेळी इतक्या काही जमत नाहीत. त्यांनी भावनेपोटी हा राजीनामा दिला. माझ्यावरचा माझ्या लोकांचा विश्वास नव्हता असं त्यांना वाटलं.  मला सत्तेचा मोह नाही, हे पटवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या काय चुका आहेत, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. उद्धव ठाकरेंनी जो राजीमाना दिला तो भावनिक राजीनामा होता, असं अनिल परब यांनी म्हटलं. 


हेही वाचा : 


Majha Katta : यामध्ये शिंदेंची काहीच भूमिका नाही, हे सगळं भाजपचं काम, माझा कट्ट्यावर अनिल परबांचा थेट वार